मुंबई : फिटनेस, ड्रेसिंग रूममधील फिडबॅक आणि सतत उपलब्धता या तीन गोष्टी डोळ्यांपुढे ठेवून हार्दिक पांड्याच्या तुलनेत सूर्यकुमार यादव याच्याकडे ‘टी-२०’ संघाचे कर्णधारपद सोपविल्याची माहिती राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी सोमवारी दिली.
श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होण्याआधी माध्यमांशी संवाद साधताना आगरकर म्हणाले, ‘हार्दिक आजही संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे; पण त्याची तंदुरुस्ती ही चिंतेची बाब आहे. ते त्याच्यासमोरील आव्हानदेखील आहे. प्रशिक्षक आणि निवड समितीला त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देणे अवघड झाले. सलग तंदुरुस्त कर्णधार निवडायचा होता. त्यामुळेच सूर्यकुमारची निवड केली. सूर्यकुमारकडे नेतृत्व कौशल्य आहे. या निर्णयाने हार्दिकवरील वर्कलोड चांगल्या पद्धतीने हाताळता येईल, असे वाटते. त्याला विश्वचषकात फलंदाजी व गोलंदाजी करताना पाहिले आहे.’
आम्ही खेळाडूंसोबत त्यांच्या बदललेल्या जबाबदारीबद्दल चर्चा करतो आणि तशी चर्चा आम्ही हार्दिकसोबतही केली,’ असेही आगरकर यांनी स्पष्ट केले.
...म्हणून अभिषेक आणि ऋतुराजला स्थान नाहीअभिषेक आणि ऋतुराजसारख्या खेळाडूंना चांगली कामगिरी करूनही संधी न मिळाल्याबद्दल आगरकर म्हणाले, ‘संघातून वगळलेल्या कोणत्याही खेळाडूला वाईट वाटेल; पण आमचे काम फक्त १५ खेळाडूंना निवडण्याचे आहे. रिंकूकडेच बघा, ‘टी-२०’ विश्वचषकापूर्वी त्याने चांगली कामगिरी केली होती; पण त्याला ‘टी-२०’ संघात स्थान मिळवता आले नव्हते. आम्ही फक्त १५ खेळाडू निवडू शकतो.’
जडेजाला बाहेर केले नाहीविश्वचषकानंतर ‘टी-२०’ला अलविदा करणारा अष्टपैलू रवींद्र जडेजा याला विश्रांती देण्यात आली आहे. त्याला बाहेर केले नसल्याचे सांगून आगरकर म्हणाले, ‘आम्ही ते स्पष्ट केले नाही, हे खरे आहे. इतक्या लहान मालिकेसाठी जडेजाला सोबत नेणे अर्थहीन आहे. जड्डूने विश्वचषकात शानदार कामगिरी केली. त्याला बाहेर केले नाही. सर्व पर्याय उपलब्ध आहेत. दोघांना लंका दौऱ्यावर नेले असते तर यापैकी एखादाच तिन्ही सामने खेळू शकला असता.’
राहुल, ऋषभ, हार्दिक शर्यतीतलोकेश राहुल, ऋषभ पंत आणि हार्दिक यांच्यासाठी नेतृत्वाची दारे बंद झालेली नाहीत, असे सांगून आगरकर म्हणाले, ‘ऋषभला मैदानावर आणणे हा हेतू पूर्ण झाला. संघात आल्यानंतर अधिक सामने न खेळताच त्याच्यावर नेतृत्वाचा भार टाकणे योग्य ठरले नसते. राहुल गेल्या काही दिवसांपासून ‘टी-२०’त नाही. अफगाणिस्तानविरुद्ध ‘टी-२०’ सामन्यात हार्दिक जखमी झाला होता. या सर्वांना पुढे संधी मिळणारच आहे. सध्या शुभमन गिल तिन्ही प्रकारांत चांगला खेळाडू असून, तो प्रतिभावान आहे. अनुभवातून नेतृत्वाची झलकही सादर केली.
शमीचे पुनरागमन होणार?भारताला कसोटीत तीन वेगवान गोलंदाजांच्या संयोजनाची गरज नसेलही; मात्र पुढे वेगवान गोलंदाजांच्या संयोजनावर विचार होईल. मोहम्मद शमीने गोलंदाजी सुरू केली आहे. १९ सप्टेंबर रोजी भारतीय संघ कसोटी सामना खेळणार असून, शमी त्याआधी फिट होईल का, हे आताच सांगता येणार नाही, असेही आगरकर यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.