मुंबई: ‘तुझी गाडी पुढे का सरकत नाही’? टीम इंडियासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागताच पत्नी देवीशा शेट्टी हिने पती सूर्यकुमार यादवला हा प्रश्न केला होता. आयपीएल व स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्य दाखविल्याने वयाच्या ३० व्या वर्षी सूर्याला राष्ट्रीय संघात अखेर स्थान मिळाले.
३१ वर्षांच्या सूर्याने मागच्यावर्षी इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले. मर्यादित षटकांत भरवशाचा शैलीदार फलंदाज अशी त्याची ओळख बनली आहे. मुंबई इंडियन्सकडून सातत्यपूर्ण कामगिरी करीत राहिला. राष्ट्रीय संघात मात्र स्थान मिळत नसल्याने, पत्नी त्याला नेहमी प्रश्न करायची. सूर्याने ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन’ या कार्यक्रमात, पत्नीमुळे राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यास मदत झाल्याचा खुलासा केला.
तो म्हणाला, ‘२०१० पासून पत्नीला डेट करीत होतो. २०१६ ला आमचे लग्न झाले. स्थानिक आणि आयपीएल सामने खेळतो, हे तिला माहिती होते. लग्नानंतर मात्र तिने विचारले, ‘सर्वकाही ठीक आहे, मग तुझी गाडी पुढे का जात नाही?’ तिच्या म्हणण्यात तथ्य होते.
१४ मार्च २०२१ ला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये इंग्लंडविरुद्ध टी-२० त पदार्पण केले. तेव्हा फलंदाजीची संधी मिळू शकली नव्हती. दुसऱ्या सामन्यात मात्र ३१ चेंडूत नाबाद ५७ धावा ठोकून सूर्याने लक्ष वेधले होते.
- २३ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत सोबत खेळलेले अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, के. एल. राहुल, सर्वांनी २०१५-१६ ला पदार्पण केले. नंतर आम्ही आहारतज्ज्ञ व फलंदाजी कोचसोबत चर्चा केली.
- याचा लाभ झाला. रात्री मित्रांसोबत बाहेर जाणे बंद केले. काही गोष्टी नियंत्रित करून क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. पत्नीमुळे हे शक्य होऊ शकले.’