वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत रंगलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यानंतर विश्वविजेता भारतीय संघ आज मायदेशात दाखल झाला आहे. सकाळी राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर आता भारतीय संघ मुंबईत दाखल होत असून, येथे संघाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मात्र भारतीय संघाच्या या मिरवणुकीपूर्वीच राज्याच्या राजकारणात मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. भारतीयं संघाची मिरवणूक काढण्यासाठी गुजरातमधून बस आणण्यात आली असून, गुजरातधार्जिण्या राज्य सरकारनं भारतीय संघाच्या स्वागतासाठी गुजरातमधून बस आणून महाराष्ट्राचा अपमान केला आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
विश्वविजेत्या भारतीय संघाची मिरवणूक आज संध्याकाळी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमदरम्यान काढण्यात येणार आहे. मात्र या मिरवणुकीसाठी आणण्यात आलेल्या बसवरून वाद निर्माण झाला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही आधीही सांगितलंय की हे मिंधे सरकार आपलं सरकारही गुजरातला हलवेल. कारण त्यांनी गुजरातसमोर लोटांगण घातलेलं आहे. मी विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचं अभिनंदन करतो. तरीदेखील मुख्य गोष्ट ही आहे की, क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी महाराष्ट्रामध्ये गुजरातच्या बस कशासाठी? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, आज संध्याकाळी विश्वविजेत्या भारतीय संघाचा सत्कार वानखेडे स्टेडियम येथे होणार आहे. तत्पूर्वी सायंकाळी ५ वाजल्यापासून मरीन ड्राईव्हवर विजय यात्रा आणि वानखेडेवर महोत्सव साजरा केला जाणार आहे. २९ जून रोजी बार्बाडोस येथे झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत विश्वविजेतेपदावर कब्जा केला होता.