नवी दिल्ली - अजिंक्य रहाणेने भारतीय कसोटी संघात सुमारे १८ महिन्यांनी पुनरागमन केले आणि त्याच्याकडे लगेच उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. संघ व्यवस्थापनाने हा निर्णय का घेतला हे मला समजले नाही, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केली. दीड वर्ष संघाबाहेर राहिलेल्या रहाणेला नुकत्याच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात निवडण्यात आले.
या सामन्यात उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडलेल्या रहाणेने अंतिम सामन्यात ८९ आणि ४६ धावांची खेळी केली होती. या सामन्यात त्याने भारताकडून सर्वाधिक धावा काढल्या. गांगुलीने यावर सांगितले की, ‘उपकर्णधारपदासाठी शुभमन गिलसारख्या युवा खेळाडूला तयार करता आले असते. मी असे नाही सांगणार की, हे मागे घेतलेले पाऊल आहे. पण, १८ महिने संघाबाहेर राहिल्यानंतर तुम्ही एक कसोटी खेळता आणि तुम्हाला उपकर्णधार बनवले जाते. यामागचा विचार मला कळला नाही. रवींद्र जडेजाही दीर्घकाळापासून संघात आहे. तो कसोटी संघात नक्कीच खेळतो. त्याचाही एक पर्याय उपलब्ध होता. मला हेच सांगायचे आहे की, निवड प्रक्रियेमध्ये सातत्य आणि स्थिरता असावी.’
खेळाडूसोबत संवाद असावा!
चेतेश्वर पुजाराबाबत गांगुलीने सांगितले की, ‘निवडकर्त्यांनी पुजाराबाबत स्पष्ट राहायला हवे होते. पुजाराला कसोटी क्रिकेटमध्ये खेळवणार आहेत की युवा खेळाडूंसोबत वाटचाल करण्याचे ठरवले आहे, याबाबत त्यांनी सांगणे गरजेचे होते. पुजारासारख्या उच्च दर्जाच्या खेळाडूला तुम्ही संघाच्या आत-बाहेर नाही करू शकत. अजिंक्य रहाणेसोबतही असेच झाले होते. त्यामुळे निवडकर्त्यांनी खेळाडूंसोबत स्पष्ट संवाद राखला पाहिजे.’
Web Title: Why is Rahane, who has been out for 18 months, immediately made vice-captain? This decision is beyond understanding", asked Sourav Ganguly
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.