मुंबई : 'स्वत:साठी काही वेळ काढण्यासाठी आणि काही प्रमाणात कार्यभार कमी करण्याच्या उद्देशाने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता,' असे सांगत स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) संघाचे कर्णधारपद सोडण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली. आयपीएलच्या २०२१ च्या सत्रानंतर कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता.
कोहलीने आधी टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारताचे टी-२० कर्णधारपद सोडणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याने आयपीएलमध्येही कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कोहलीला भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटविले होते आणि त्यानंतर त्याने कसोटी संघाचेही नेतृत्व सोडले.
कोहलीने आरसीबीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले की, 'काही लोकं अनेक गोष्टी पकडून ठेवतात. मी त्यातला नाही. जर मला माहितेय की, मी खूप काही करू शकतो, पण त्या कामाचा किंवा त्या प्रक्रियेचा आनंद घेता येत नसेल, तर मी ते काम नाही करणार. जेव्हा कोणताही क्रिकेटपटू असा निर्णय घेतो, तेव्हा त्याच्या मनात काय विचार सुरू असतात याची लोकांना कल्पनाच नसते. लोकांच्या त्याच्या वेगळ्या अपेक्षा असतात.'
कोहली पुढे म्हणाला की, 'यामध्ये चकीत होण्यासारखे काहीच नाही. मी लोकांची बाजू समजतो आणि मला माझ्यासाठीही काही वेळ पाहिजे; तसेच, माझ्यावरील कार्यभाराचे योग्य व्यवस्थापन करण्याची माझी इच्छा होती. त्यामुळे या गोष्टी येथेच संपतात.