Join us  

प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड खास का आहे?; सौरव गांगुलीनं सांगितलेला किस्सा वाचून वाढेल आदर

टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये निर्माण झालेलं वादाचं वादळ  राहुल द्रविडच्या ( Rahul Dravid) मार्गदर्शनाखाली नाहीसं होऊन खेळाडूंना शिस्तीची सवय लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 10:37 AM

Open in App

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बरेच बदल पाहायला मिळत आहेत. रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्यानंतर आता राहुल द्रविड- रोहित शर्मा यांच्या खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी आहे. विराट कोहली आता फक्त कसोटी संघाचा कर्णधार राहिला आहे. द्रविड व रोहित ही जोडी आगामी ट्वेंटी-२० व वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघबांधणीच्या तयारीला आतापासूनच लागले आहेत. त्यामुळे युवा खेळाडूंना अधिक संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये निर्माण झालेलं वादाचं वादळ  राहुल द्रविडच्या ( Rahul Dravid) मार्गदर्शनाखाली नाहीसं होऊन खेळाडूंना शिस्तीची सवय लागणार आहे. पण, द्रविडला या पदासाठी तयार करणं ही सोपी गोष्ट नव्हती. माजी कर्णधार व बीसीसीआयचे अध्य़क्ष सौरव गांगुलीनं ( Sourav Ganguly) हे याआधीही सांगितलं आहे.      

भारतीय क्रिकेटचं भविष्य कसं असेल?, क्रिकेट नेक्स्टसोबत बोलताना गांगुलीनं यावर उत्तर दिलं. तो म्हणाला, ''आपल्याकडे एक चांगला प्रशिक्षक आणि योग्य कर्णदार आहे. मागील ५ वर्षांत भारतानं यशाचे झेंडे अटकेपार रोवले.  त्यामुळे पुढेही भारतीय संघाची कामगिरी अशीच होईल.'' या मुलाखतीत गांगुलीनं टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविड खास का आहे?. यावर एक मजेशीर किस्सा सांगितला.

गांगुलीनं सांगितलं की,'' कानपूर कसोटीआधी भारतीय संघाच्या सराव सत्रानंतर  राहुल द्रविड विकेट्स, व सरावासाठी वापरण्यात आलेले चेंडू व अन्य सामान स्वतः उचलून ड्रेसिंग रुममध्ये घेऊन गेला, हे माझ्या ऐकण्यात आलं. राहुलला असं करताना पाहणं हे कॅमेरामन व फोटोग्राफर यांना टिपण्यासाठी खूप चांगला क्षण होता, परंतु मी त्याला बऱ्याच आधीपासून ओळखतो. तो असाच आहे. खेळाशी निगडीत लहानातल्या लहान गोष्टीकडे त्याचं बारकाईनं लक्ष असतं.''

याआधी गांगुलीनं दिलेल्या एका मुलाखतीत राहुल द्रविडला टीम इंडियाला प्रशिक्षकपदासाठी कसं तयार केलं. याची माहिती दिली. ''आयपीएल स्पर्धाकालावधीतच भारतीय प्रशिक्षकाला एक महिना घरच्यांसोबत वेळ घालवायला मिळतो. त्यामुळे घरच्यांपासून अधिककाळ लांब राहण्याच्या विचारामुळेच द्रविड ही जबाबदारी स्वीकारण्यास मना करत होता. कारण, त्याला भारतीय संघासोबत ८ ते ९ महिने दौऱ्यांवरच रहावे लागेल. त्याची दोन मुलं आहेत.''

गांगुली पुढे म्हणाला,''आम्ही जवळपास हार मानलीच होती. त्यामुळे राहुलची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी नियुक्ती निश्चित केली होती. आम्ही मुलाखतीही घेतल्या आणि त्याला NCAचा प्रमुख बनवलं. पण, NCAची जबाबदारी पार पाडणाऱ्या राहुलच्या आम्ही सातत्यानं संपर्कात होतो. अखेर त्यानं प्रशिक्षक होण्यास होकार दिला. रवी शास्त्री यांच्यानंतर मुख्य प्रशिक्षख म्हणून यापेक्षा चांगला पर्याय हाच आहे.''

भारताच्या सीनियर संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्यापूर्वी राहुल द्रविड ४ वर्ष भारत अ आणि १९ वर्षांखालील संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारत अ संघात खेळणाऱ्या अनेक खेळाडूंनी सीनियर संघात पदार्पण केलं. २०१८मध्ये १९ वर्षांखालील संघानं वर्ल्ड कप जिंकला.   

टॅग्स :राहुल द्रविडसौरभ गांगुली
Open in App