इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या हंगामात रिषभ पंतदिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात दिसणार नाही. दिल्ली कॅपिल्सच्या रिटेंशन यादीत त्याचे नाव नसल्याची गोष्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. मागील नऊ वर्षांपासून रिषभ पंतदिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून खेळताना दिसला. २०१६ मध्ये त्याने आपल्या घरच्या टीमकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पण आता त्याने दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीसोबतच त्याच नातं तुटलं आहे. या 'ब्रेकअप'मागचं नेमकं कारण काय? हा प्रश्नही आता चर्चेचा विषय ठरतोय जाणून घेऊयात त्यामागची गोष्ट
खास छाप सोडत कॅप्टन्सी मिळवली, पण...
रिषभ पंत याने दिल्ली कॅपिटल्समध्ये एक वेगळी छाप सोडली होती. २०२१ च्या हंगामात श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने त्याच्या खांद्यावर कॅप्टन्सीची जबाबदारीही सोपवली होती. अपघातामुळे २०२३ च्या हंगामाला मुकल्यावर २०२४ मध्ये त्याने दिमाखात कमबॅक केले. पण त्याच्या कॅप्टन्सीत संघाला प्लेऑफ काही गाठता आली नव्हती.
१८ कोटींसह पहिल्या पसंतीचा रिटेन खेळाडू होता पंत
रिषभ पंत हा स्टार खेळाडू आहे. कोणताही संघ अशा खेळाडूला रिलीज करण्याचा विचार करणार नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या संघालाही पंतसोबतच नातं जपायचं होते. पण मग असं काय घडलं ज्यामुळे पंतनं आपल्या होम टीमसोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. हा मोठा प्रश्नच आहे. क्रिकेट वर्तुळात जी चर्चा रंगतीये त्यानुसार, १८ कोटींसह दिल्ली कॅपिटल्सचा संघ रिषभ पंतला पहिल्या पसंतीच्या खेळाडूच्या रुपात रिटेन करण्याची तयारी दर्शवली होती. पण इथं गोष्ट पैशाची नव्हती तर ती वेगळीच आहे.
पंतला ही गोष्ट खटकली? दिल्ली कॅपिटल्सचा संघ रिषभ पंतला खेळाडूच्या रुपात रिटेन करणार होता. कारण हा संघ पुढच्या हंगामासाठी नव्या कॅप्टनच्या शोधात आहे. जो संघाला चॅम्पियन करू शकेल. पंतच्या कॅप्टन्सीत संघाला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघ फक्त एकदाच प्लेऑफमध्ये पोहचला आहे. पण पंतला ही ऑफर मान्य नव्हती. कॅप्टन्सीशिवाय अन्य काही गोष्टीही आहेत, ज्यामुळे पंतनं संघासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला, असेही बोलले जात आहे. खरं कारण काय ते दिल्ली कॅपिटल्स व्यवस्थापन आणि पंतलाच माहिती असेल.
DC ला पहिल्या प्रेमाची आठवण?
रिषभ पंतआधी दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कॅप्टन्सीची धूरा ही श्रेयस अय्यर सांभाळताना दिसले होते. २०२० च्या हंगामात अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने फायनलही गाठली होती. पण त्यावेळी मुंबई इंडियन्स विरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. २०२१ च्या हंगामात खांद्याच्या दुखापतीमुळ श्रेयस अय्यर आयपीएलमधून आउट झाला. त्यानंतर दिल्लीच्या संघाचे नेतृत्व पंतकडे आले होते. अय्यर परतल्यावरही पंत कर्णधारपदी कायम राहिला. २०२२ च्या मिनी लिलावाआधी दिल्लीच्या संघाने श्रेयस अय्यरला रिलीज केले. तो कोलकाता संघात गेला. एवढेच नाही तर त्याच्या कॅप्टन्सीत केकेआरचा संघ चॅम्पियनही ठरला. सध्या जी चर्चा रंगतीये त्यानुसार केकेआर श्रेयस अय्यरला कायम ठेवणार नाही. त्यामुळे DC ला त्याच्या रुपात पहिलं प्रेम आठवलं आहे, असे एक चित्र निर्माण झाले आहे. हेच रिषभ पंतच्या ब्रेकअपमागचं खरं कारण असू शकतं.