नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघात रिषभ पंतचे नाव नसल्याने अनेकांना धक्का बसला. महेंद्रसिंग धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून रिषभचे नाव आघाडीवर असताना निवड समितीने दिनेश कार्तिकच्या नावाची निवड केली. रिषभ हा 21 वर्षांचा आहे आणि त्याला भविष्यात वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्याची संधी मिळू शकते. तसेच इंग्लंडमध्ये अनुभवी खेळाडूची आवश्यकता असल्याने कार्तिकची निवड करण्यात आल्याचे निवड समिती प्रमुखे एमएसके प्रसाद यांनी सांगितले. त्यामुळे या चर्चेवर पडदा पडला होता. पण आता तर संघाचा कर्णधार विराट कोहलीने पंत संघात का नाही, याचे कारणही दिले आहे.
पंतच्या बाबतीत कोहली म्हणाला की, " विश्वचषकासाठी आम्ही सर्वोत्तम संघ निवडला आहे. त्याचबरोबर जे पर्याय आम्ही ठेवले आहेत त्यांचाही योग्य विचार केला आहे. पंतला या संघात स्थान देण्यात आले नसले तरी हा निर्णय योग्य आहे. कारण पंतकडे जास्त अनुभव नाही. त्याचबरोबर दडपणाच्या परिस्थितीमध्ये पंतला चांगली कामगिरी करता आलेली नाही. पंतला अजूनही दडपण हाताळण्यामध्ये जास्त यश मिळाले नाही. त्यामुळेच त्याचा विचार विश्वचषकासाठीच्या संघात करण्यात आला नाही."
२०१९ मध्ये भारतात लोकसभेच्या निवडणुकीत काय होणार, याची जेवढी उत्सुकता देशवासीयांना आहे, साधारण तितकीच उत्कंठा यावर्षी इंग्लंडमध्ये काय होणार याचीही आहे. यंदाचा क्रिकेट वर्ल्ड कप क्रिकेटच्या पंढरीत होतोय. १९८३ मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर भारतानं पहिल्यांदा जगज्जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्याची पुनरावृत्ती विराटसेनेनं करावी, अशी तमाम क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. पण हे 'मिशन' अजिबातच सोपं नाही. एकापेक्षा एक तगडे प्रतिस्पर्धी या रणांगणात उतरणार आहेत. त्यांना टक्कर देऊ शकणारे १५ वीर भारताने काल निवडलेत. अनुभवी शिलेदार आणि नव्या दमाचे भिडू असा समन्वय साधायचा निवड समितीने प्रयत्न केलाय आणि तो बऱ्याच अंशी यशस्वीही झाल्याची चर्चा आहे. पण, या नव्या भिडूंमध्ये एक जिगरबाज युवा खेळाडू नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय. हा तरुण वीर म्हणजे, रिषभ पंत. यष्टिरक्षक म्हणून निवड समितीने महेंद्रसिंग धोनीसोबतदिनेश कार्तिकला पसंती दिल्यानं पंतचं तिकीट कापलं गेलं. पण, 'पंतां'ची निवड वर्ल्ड कपसाठी झाली नाही, हे बरंच झालं. कारण, संघात न झालेला समावेश त्याच्या कारकिर्दीसाठी फायद्याचा ठरू शकतो.
कुठल्याही भारतीय यष्टिरक्षकाला न जमलेला पराक्रम रिषभ पंतनं करून दाखवला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात शतक झळकावण्याची किमया या तरुण-तडफदार वीरानं केली आहे. हा विक्रम पाहता, इंग्लंडमधील वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रिषभलाच पहिली पसंती द्यायला हवी होती, असं कुणालाही वाटेल. आयपीएलमधील त्याची कामगिरीही दिनेश कार्तिकपेक्षा सरसच आहे. त्यामुळे त्याच्यावर अन्याय झाल्याचं काही जणांना वाटतंय. पण, निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांचं म्हणणं नीट ऐकलं तर, पंतवर अन्याय नाही, तर या गुणवान खेळाडूला न्यायच दिला गेलाय, असं स्पष्ट जाणवतं.