Virender Sehwag Virat Kohli IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीग 2022 च्या एलिमिनेटर सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हे संघ समोरासमोर आहेत. यंदातरी RCB जेतेपदाचा दुष्काळ संपवेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. पण, आयपीएल 2022मधील त्यांची कामगिरी ही सातत्यपूर्ण झालेली नाही. फॅफ ड्यू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली त्यांनी सुरुवात तर दणक्यात केली, परंतु त्यानंतर गटांगळ्या खाल्ल्या. मुंबई इंडियन्सच्या कृपेने त्यांनी प्ले ऑफमधील स्थान पक्के केले.
दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) याने फॅफ ड्यू प्लेसिस व प्रशिक्षक संजय बांगर यांचे कौतुक केले आहे. त्याने विराट कोहलीच्या नेतृत्व काळातील चूक समोर मांडताना RCB ला एकदाही आयपीएल जेतेपद का जिंकता आले नाही, याचं उत्तर दिलं.
तो म्हणाला,'' मुख्य प्रशिक्षक संजय बांगर आणि कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस यांच्या येण्याचे RCB चे विचार बदलले. विराट कोहली कर्णधार असताना 2-3 सामन्यांत अपयशी ठरलेल्या खेळाडूला तो थेट बाहेर करायचा, हे सर्वांनी पाहिलं आहे. पण, आता बांगर व फॅफ तसं करत नाही. ते संघात फार बदल करत नाही. रजत पाटिदारचा अनुज रावतच्या जागी समावेश वगळला, तर खराब कामगिरीमुळे त्यांनी कोणता बदल केलेला नाही.''
Cricbuzz शी बोलताना सेहवाग म्हणाला. फॅफ ड्यू प्लेसिसला कर्णधार बनवण्याचा निर्णय हा व्यवस्थापनाचा मास्टरस्ट्रोक होता. जर भारतीय खेळाडूला कर्णधार केले असते, तर तो विराटच्या दबावाखाली राहिला असता आणि मग त्याला विराटचे सल्ले ऐकावे लागले असते, असेही वीरू म्हणाला. ''भारतीय कर्णधार असता आणि विराट कोहलीने जर त्याला एखादा सल्ला दिला असता. तर त्याला तो दबावामुळे ऐकावा लागला असता. फॅफ ड्यू प्लेसिस कर्णधार झाल्यामुळे हे चित्र बदलले. संजय बांगरने विराटसोबत काम केले आहे आणि त्यामुळे तो विराटशी त्याच्या सल्ल्याबद्दल चर्चा करतो,''असे वीरू म्हणाला.