Virat Kohli 49th Century: विराट कोहलीला वाढदिवसानिमित्त आणि नंतर सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक वन डे शतकांच्या विक्रमाशी बरोबरीच्या विक्रमासाठी अभिनंदन करण्यासाठी क्रिकेट विश्व सोशल मीडियावर एकवटले. ईडन गार्डन्सवर विराटने इतिहास रचला आणि असे असताना, श्रीलंका आणि बांगलादेश दिल्लीतील त्यांच्या लढतीसाठी तयारी करत होते. हा सामना त्यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पात्रता संधीसाठी महत्त्वपूर्ण आहे. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत, श्रीलंकेचा प्रभारी कर्णधार कुसल मेंडिस याला एका पत्रकाराने विचारले की तुम्हाला कोहलीचे अभिनंदन करायचे आहे का?
“मी त्याचे अभिनंदन का करू?” असे मेंडिसने पत्रकारालाच विचारले.
बांगलादेश वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाद झाला आहे. सात सामन्यांतून फक्त दोन विजय आणि खराब नेट रन रेटसह श्रीलंकाही जवळपास स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे. दुखापतग्रस्त दासून शनाकाच्या अनुपस्थितीत मेंडिसने ३१ ऑक्टोबरला वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्ध संघाचे नेतृत्व केले होते आणि भारताने केवळ ५५ धावांवर त्यांचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला होता. सध्या श्रीलंका गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी पात्र ठरायचे असल्यास त्यांना ते स्थान कायम राखावे लागेल.