न्यूझीलंडने दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाला पराभूत करून तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली... त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतील विराट कोहलीचं वाक्य आठवतं. तो म्हणालेला," यंदाच्या वर्षात वन डे क्रिकेट नव्हे तर ट्वेंटी-२० आणि कसोटी हे आमचे प्राधान्यक्रम आहे." म्हणजे वन डेतील पराभवाची त्याला फार चिंता नाही, असा त्याचा अर्थ होतो. पण, जगातील अव्वल संघाचे नेतृत्व करताना असं विधान करणं कितपत योग्य आहे? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजतं ठेवण्यासाठी तुम्हाला सर्व फॉरमॅटमध्ये प्रभूत्व गाजवणं गरजेचे असते, हे विराट विसरला वाटत? यंदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपदाच्या शर्यतीत कायम राखणे हे प्रत्येक संघाचे लक्ष्य आहे. पण, म्हणून वन डे प्राधान्यक्रमावर नाही असं भाष्य कोणी केलं नाही. आता विराटच्या या मानसिकतेमुळेच आपल्याला न्यूझीलंडकडून वन डे मालिकेत सपाटून मार खावा लागला...
ट्वेंटी-२०तील मानहानीकारक पराभवानंतर असं कमबॅक करणाऱ्या न्यूझीलंडचे मोठ्या मनानं कौतुक करायला हवं. त्याचवेळी टीम इंडियाच्या पराभवामागील कंगोरेही शोधायला हवेत..
वन डे मालिकेपूर्वी भारतीय संघाला बसलेला सर्वात मोठा धक्का म्हणजे रोहित शर्माची दुखापत. शिखर धवनने आधीच या मालिकेतून माघार घेतली होती आणि त्यात रोहितची भर पडली. नियमित सलामीची जोडी नसणे हे कोणत्याही संघासाठी डोकेदुखी ठरण्यासाठी पुरेसं कारणं आहे. पण, भारताकडे त्याच ताकदीची राखीव फळीही उपलब्ध आहे. शिखर- रोहित यांच्या अनुपस्थितीत पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल या नव्या सलामीच्या जोडीचा प्रयोग या मालिकेत झाला. सुरुवातीला फॉर्मात असलेला लोकेश राहुल ओपनिंग करेल असे वाटत होते, परंतु कोहलीनं नव्या जोडीलाच मैदानावर उतरवले. पृथ्वी आणि मयांक यांनी एकाच सामन्यातून वन डे कारकिर्दीला सुरुवात केली. कोहलीचा हा डाव सपशेल अपयशी ठरला नाही, पण त्याने फार यश मिळवून दिले असेही नाही. न्यूझीलंडसारख्या संघासमोर नवीन जोडी उतरवणे हे आत्मघातकी काम होते आणि आत्मघात झालाच. या जोडीला मोठी चांगली सुरुवात करून देता आली नाही. पृथ्वीन छोटेखानी खेळ केला, परंतु मयांकने सपशेल निराश केले.
पायाच डळमळीत रचल्यानंतर पुढच्यांना कशी कसरत करावी लागली हे आपण पाहिलेच. या संपूर्ण मालिकेत सर्वात निराश केले ते विराट कोहलीनं.. प्रतिस्पर्धी संघाचा कर्दनकाळ असलेल्या कोहलीला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे मधल्या फळीवरील दडपण वाढले. पण या दडपणातही लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी आपली भूमिका चोख बजावली. अय्यरने तर भारताची चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची शोध संपवली. आता या क्रमांकावर श्रेयस फिट आहे. केदार जाधवसाठी हा दौरा अखेरचा ठरला नाही मग झालं... त्याची जागा भरून घेण्यासाठी बरेच जणं रांगेत आहेत. हार्दिक पांड्यासारखा अष्टपैलू खेळाडूची उणीव या मालिकेत प्रकर्षाने जाणवली. केदार ती भूमिका निभावू शकला नाही. त्याला गोलंदाजीची संधी का दिली नाही हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. रवींद्र जडेजानं त्याची कामगिरी चोख बजावली.
भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिकेत दोन सामने तर पराभवाच्या छायेतून बाहेर काढून जिंकले. यावेळी गोलंदाजांचे फार कौतुक झाले. पण वन डे मालिकेतील अपयशालाही ते तितकेच कारणीभूत ठरले. गंमतीचा भाग बघा, पहिल्या सामन्यात ३४७ धावांचा बचावही आपल्याला करता आला नाही. पण त्याच गोलंदाजांनी दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला २७३ धावा करण्यासाठी रडवलं. पण याच सामन्यात रॉस टेलरनं तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन भारतीय गोलंदाजांच्या उणीवा उघड्यावर आणल्या. तिसऱ्या सामन्यातही तेच चित्र... संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला वन डे मालिकेत एकही विकेट घेता न येणं हे संघाच्या अपयशाचं प्रमुख कारण.. बुमराहनं तीन सामन्यांत 167 धावा दिल्या. शार्दूल ठाकूरनं चार विकेट्स घेतल्या, परंतु त्यानं सर्वाधिक 227 धावा दिल्या. नवदीप सैनी ( 116 धावा), कुलदीप यादव ( 84 धावा, 1 सामना), रवींद्र जडेजा ( 144) यांनी गोलंदाजीत निराश केले. सैनी आणि जडेजा यांनी फलंदाजीत दिलेलं योगदान हे सर्वांसाठी आश्चर्यकारक नक्की ठरलं.
दुखातग्रस्त खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची दुसरी फळी या मालिकेत अपयशी ठरली. तसेही विराटची मानसिकता पाहाता त्यानं सर्व लक्ष्य ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि कसोटी मालिकांवर केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या दौऱ्यानंतर मायदेशात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत टीम इंडियाला हार मानावी लागली तर आश्चर्य वाटायला नको...
लोकेश राहुलचं विशेष कौतुक....लोकेश राहुलनं या मालिकेत आतापर्यंत दुहेरी जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. त्यानं यष्टिंमागे अचुक कामगिरी करताना फलंदाजीत संघातील स्थान आणखी मजबूत केलं आहे. कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास आपण तयार आहोत, याची प्रचिती त्यानं या मालिकेत दिली. त्यानं वन डे मालिकेत 1 शतक आणि 1 अर्धशतकाच्या जोरावर 204 धावा केल्या. यष्टिंमागे एक कॅच व एक स्टम्पिंगही केले.