चेन्नई : महेंद्रसिंह धोनी यंदाच्या आयपीएलनंतर निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सध्या क्रिकेट जगतात रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मी नाही, तर तुम्हीच मी रिटायर होणार असल्याचे ठरवून टाकले, असे विधान करीत धोनीने निवृत्तीच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पण, पुन्हा या चर्चेला ऊत आला आहे.
चेपॉक स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध १५ धावांनी विजय मिळवून अंतिम फेरी गाठताच धोनी निवृत्तीच्या चर्चेला पुन्हा उधाण आले. समालोचक हर्षा भोगले यांनी थेट धोनीला त्याच्या निवृत्तीसंदर्भात विचारले असता आताच ही डोकेदुखी कशाला, असा उलट सवाल धोनीने केला.
काय म्हणाला धोनी...हर्षा भोगले यांनी विचारले, ‘तू इथे येऊन पुन्हा खेळशील का?’ यावर ४१ वर्षांचा धोनी हसला, ‘मला माहीत नाही. माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी ८-९ महिने आहेत. डिसेंबरच्या आसपास एक छोटासा लिलाव होणार आहे, मग आताच ही डोकेदुखी का करावी. माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ आहे. मी ३१ जानेवारीपासून घराबाहेर आहे. २ मार्चपासून सराव करीत आहे, याक्षणी माझ्याकडे हा निर्णय घेण्यासाठी भरपूर वेळ आहे.’ त्याचप्रमाणे, ‘पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, मी एक खेळाडू किंवा अन्य भूमिकेत सीएसकेसोबत कायम राहीन’, असेही धोनीने यावेळी स्पष्ट केले.