No Ball Controversy Rishabh Pant, IPL 2022 DC vs RR: दिल्ली विरूद्धच्या सामन्यात राजस्थानने १५ धावांनी विजय मिळवला. राजस्थानच्या जोस बटलरने हंगामातील तिसरे शतक झळकावत संघाला २२२ धावांपर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात खूप मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळाला. शेवटच्या षटकात ३६ धावांची गरज असताना पहिल्या तीन चेंडूवर फलंदाजाने षटकार लगावले. त्यातील तिसरा चेंडू फुलटॉस कमरेच्या वर होता, त्यामुळे तो नो बॉल असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. पण पंचांनी मात्र तो नो बॉल दिला नाही. त्यामुळे दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत प्रचंड संतापला. घडलेल्या प्रकारानंतर याची बरीच चर्चा झाली. जर तिसऱ्या पंचांना हे दिसत होतं, तर त्यांनी यात हस्तक्षेप का केला नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. पाहूया या बद्दलचा नियम-
नो-बॉल न देण्यावरून सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. कमेरच्या वर चेंडू असल्याने अनेकांच्या मते हा नो-बॉल होता. गोलंदाजी करताना फ्रंटफूटच्या नो-बॉलचा निर्णय तिसऱ्या पंचाचा असतो. कमरेच्या वर फुलटॉस चेंडू आल्यानंतरही तिसरे पंच नो बॉल चेक करतात हे अनेकदा पाहिलं आहे. मग या सामन्यात तिसऱ्या पंचांनी हस्तक्षेप का केला नाही? असा सवाल उपस्थित झाला. पण IPL ने ठरवलेल्या नियमावलीनुसार, कमरेच्या वर फुलटॉस चेंडू असेल, आणि फलंदाज बाद तरच थर्ड अंपायर त्यात हस्तक्षेप करू शकतो. पण वाद झालेला चेंडू मात्र षटकार होता, त्यामुळे तिसऱ्या पंचाची मदत घेता आली नाही.
दरम्यान, राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना २ बाद २२२ धावा केल्या. सलामीवीर जोस बटलरने ६५ चेंडूत ११६ धावांची खेळी केली. देवदत्त प़ड़िकलने देखील अर्धशतक झळकावले. तर संजू सॅमसनने १९ चेंडूत नाबाद ४६ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात रिषभ पंतने २४ चेंडूत ४४ धावा केल्या. ललित यादवने ३७ धावांची खेळी केली. तर पृथ्वी शॉ ने २७ चेंडूत ३७ धावा केल्या. शेवटच्या षटकात रॉवमन पॉवेलने तीन षटकार लगावत सामन्यात रंगत आणली होती. पण अखेर दिल्ली पराभूत व्हावे लागले.