भारतात सुरू असलेला वन डे विश्वचषक विविध नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत आहे. क्रिकेटच्या मैदानावरील कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मैदानात म्हणावा तसा 'सामना' झाला नाही. भारतीय संघाने एखाद्या क्लबच्या टीमप्रमाणे पाकिस्तानची जोरदार धुलाई केली. एकतर्फी विजय मिळवून टीम इंडियाने आपला विजयरथ कायम ठेवला. भारताला सर्व पाच तर पाकिस्तानला सुरूवातीच्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात यश आले. त्यानंतर शेजाऱ्यांनी पराभवाची हॅटट्रिक लगावली. पाकिस्तानने आपल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता. त्या सामन्यातील शतकवीर मोहम्मद रिझवानने मैदानावरच नमाज अदा केली अन् वाद चिघळला.
रिझवानने श्रीलंकेविरूद्धचा विजय गाझामधील लोकांना समर्पित केला. त्यानंतर त्याला सोशल मीडियावर लक्ष्य करण्यात आले. काही अतिउत्साही चाहत्यांनी रिझवानसमोर नारेबाजी केली. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरियाने मोहम्मद रिझवानला सुनावले आहे. दानिश कनेरियाने म्हटले, "पाकिस्तानी खेळाडू क्रिकेटमध्ये धर्माला का आणत आहेत. भारतीय खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि मोहम्मज शमी का मैदानात प्रार्थना करत नाहीत. विद्यमान पाकिस्तानी संघात धर्म, राजकारण आणि मग क्रिकेट असे वातावरण आहे. जर तुम्हाला नमाज अदा करायची असेल तर त्यासाठी ड्रेसिंगरूम आहे. सर्वांसमोर प्रार्थना करण्याची काय गरज आहे? आम्ही देखील पुजा करतो पण मैदानातच आरतीला सुरूवात करत नाही." दानिश कनिरेया एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलत होता.
मोहम्मद रिझवान अन् वाद
मोहम्मद रिझवान विश्वचषकाच्या सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या विजयानंतर एक वादग्रस्त पोस्ट केली होती. या सामन्यात रिझवान १२१ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १३४ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानने ४८.२ षटकांत ६ विकेट्स राखून सामना जिंकला. सामन्यानंतर मोहम्मद रिझवानने आपली खेळी गाझामधील इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धातील पीडितांना समर्पित केली. यानंतर त्याच्यासमोर अहमदाबाद येथे जय 'श्री राम'चे नारे लगावण्यात आले.
Web Title: Why Virat Kohli and Rohit Sharma don't pray on the field, former Pakistan player Danish Kaneria criticizes Mohammad Rizwan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.