West Indies Vs Australia : वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात विचित्र प्रकार पाहायला मिळाला. यजमान विंडीज संघाला 10 खेळाडूंसहच मैदानावर खेळावे लागले. ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत असताना विंडीज कर्णधार किरॉन पोलार्ड पंचांनी फ्री-हिट दिल्यानंतर थेट सीमारेषेबाहेर जाऊन उभा राहिला.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील 17व्या षटकात हा विचित्र प्रकार घडला. अकिल होसैननं टाकलेला दुसरा चेंडू अम्पायरनं नो बॉल दिला. विंडीजनं 30 यार्डाच्या सर्कलबाहेर जास्तीचे खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी उभे केले होते. स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या अम्पायरला ही बाब लक्षात आली अन् अकिलनं टाकलेला चेंडू अवैध ठरवला गेला.
ऑस्ट्रेलियाच्या संघाल फ्री हिट मिळाला आणि फलंदाजानं स्ट्राईक चेंज न केल्यामुळे आहे ते क्षेत्ररक्षण बदलण्यास परवानगी नसते. पोलार्ड शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करत होता आणि नियमानुसार त्याला तिथेच रहावे लागले असते. त्यामुळे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी पोलार्डनं सीमारेषेबाहेर जाऊन उभं राहणं गरजेचं समजलं.