West Indies vs New Zealand 1st T20I : भारतीय संघाकडून ट्वेंटी-२० मालिकेत हार पत्करावी लागल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ न्यूझीलंडविरुद्ध ट्वेंटी-२० मालिकेत दम दाखवण्याचा प्रयत्न करतोय. केन विलियम्सन वर्ल्ड कपनंतर ट्वेंटी-२० संघात परतल्याने किवी चाहते आनंदात आहेत. त्यात न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात १३ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडच्या ५ बाद १८५ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला ७ बाद १७२ धावा करता आल्या. पण, या सामन्यात शिमरोन हेटमायर ( Shimron Hetmyer) याने घेतलेला अफलातून कॅच सर्वांचे लक्ष वेधून गेला. हेटमायरच्या या कॅचने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याचा ट्वेंटी-२० मधील मोठा विक्रम मोडता मोडता वाचवला.
प्रथम फलंदाजी करताना किवींनी ५ बाद १८५ धावा केल्या. डेव्हॉन कॉनवे २९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर माघारी परतला, तर केन विलियम्सने ३३ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४७ धावा केल्या. जिमी निशॅमने १५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३३ धावा करून संघाला मोठा पल्ला गाठून दिला. विंडीजच्या ओडीन स्मिथने तीन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात, सामराह ब्रुक्सच्या ४२ धावांच्या खेळीनंतरही विंडीजला विजय मिळवता आला नाही. रोमारिओ शेफर्ड ( ३१*) व जेसन होल्डर ( २५) यांची खेळीही व्यर्थ ठरली. मिचेल सँटनरने १९ धावांत ३ विकेट्स घेत विंडीजला धक्के दिले. ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, ल्युकी फर्ग्युसन व इश सोढी यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.
हेटमायरचा अफलातून कॅच अन् किवींच्या डावातील ७व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शिमरोन हेटमायरने सीमारेषेवर एका हाताने अफलातून झेल घेतला. मार्टिन गुप्तील व कॉनवे यांची ६२ धावांची भागीदारी संपुष्टात आली. गुप्तीलने ओडीन स्मिथने टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने हवेत उडवला.. हा चेंडू षटकार जाईल असे वाटत असताना हेटमायर हवेत झेपावला अन् एका हाताने अफलातून झेल टिपला. गुप्तीलला १६ धावांवर माघारी जावे लागले. गुप्तीलने आज मोठी खेळी केली असती तर ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रोहित शर्माचा (३४८७ ) विक्रम मोडला गेला असता. गुप्तील ३४६२ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.