West Indies vs Afghanistan : साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने जुन्या आठवणी ताज्या केल्या. यंदाच्या विश्वचषकातील सर्वाधिक धावसंख्या उभारण्यात त्यांना यश आले. क गटातील अखेरच्या सामन्यात अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज हे संघ भिडले. लुसिया येथील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ही लढत होत आहे. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने यजमानांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यात निकोलस पूरनने अजमतुल्लाह उमरजईच्या एकाच षटकात ३६ धावा खेचल्या अन् इतिहास रचला.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने सुरुवातीपासूनच स्फोटक खेळी केली. अफगाणिस्तानकडून अजमतुल्लाह उमरजई डावाचे चौथे षटक घेऊन आला. या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर पूरनने षटकार ठोकले, तिसरा चेंडू चौकार देऊन गेला. मग लेग बायच्या ४ धावा मिळाल्या आणि नो बॉलमुळे पूरनला मोठा फटका मारण्याची आयती संधी मिळाली अन् चौकार गेला. तसेच या षटकात एकूण ५ चेंडू वाईड गेल्याने अतिरिक्त धावांचा जणू काही पाऊसच. अखेरीस देखील षटकार मारण्यात पूरनला यश आले. अशा पद्धतीने वेस्ट इंडिजने एका षटकात ३६ धावा केल्या. उमरजईच्या या षटकात विडिंजला १० अतिरिक्त धावा मिळाल्या. यामध्ये पाच वाईड, एक नो-बॉल आणि चार लेग-बाय यांचा समावेश होता.
दरम्यान, निकोलस पूरनच्या ९८ धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानला तगडे लक्ष्य दिले. विश्वचषकाच्या सुरुवातीपासून चांगली कामगिरी करत असलेल्या अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंना 'पूरन' वादळ रोखता आले नाही. विजयाचा चौकार मारण्यासाठी अफगाणिस्तानसमोर २१९ धावांचे विशाल आव्हान आहे. वेस्ट इंडिजने निर्धारित २० षटकांत ५ बाद २१८ धावा केल्या. निकोलस पूरनशिवाय जॉन्सन चार्ल्सने चांगली खेळी केली. त्याने २७ चेंडूत ४३ धावा कुटल्या. पूरनला अवघ्या २ धावांमुळे शतकापासून दूर राहावे लागले. त्याने ८ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ५३ चेंडूत ९८ धावांची अप्रतिम खेळी केली. पण, अखेरच्या षटकात तो धावबाद झाल्याने त्याला शतकापासून लांब राहावे लागले. अफगाणिस्तानकडून गुलाबदीन नायबने सर्वाधिक (२) बळी घेतले, तर अजमतुल्लाह उमरजई आणि नवीन-उल-हक यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.