Join us  

WI vs AFG : वेस्ट इंडिजच्या विजयाचा चौकार! १०४ धावांनी सामना जिंकला; अफगाणिस्तानचा विजयरथ रोखला

WI vs AFG T20 World Cup 2024 : यजमान वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानचा पराभव करून विजयाचा चौकार लगावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 9:17 AM

Open in App

WI vs AFG T20 World Cup 2024 Live Match Updates : ट्वेंटी-२० विश्वचषकात यजमान वेस्ट इंडिजने आपला विजयरथ कायम ठेवला. साखळी फेरीतील सर्व चार सामने जिंकून विंडिजच्या संघाने विजयाचा चौकार लगावला. मंगळवारी झालेल्या सामन्यात त्यांनी अफगाणिस्तानचा दारूण पराभव केला. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधील ४०व्या सामन्यात वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान हे संघ भिडले. लुसिया येथील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ही लढत झाली. प्रथम फलंदाजांनी मग गोलंदाजांनी कमाल करून वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानला पराभवाची धूळ चारली. यजमानांनी अफगाणिस्तानविरूद्ध तब्बल १०४ धावांनी विजय मिळवून आपला विजयरथ कायम ठेवला.  

वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान या संघांनी क गटातून आधीच सुपर-८ मध्ये प्रवेश मिळवला आहे. आजचा सामना म्हणजे केवळ सराव होता. पण, यजमानांनी दिलेल्या २१९ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला घाम फुटला. अफगाणिस्तानचा संघ १६.२ षटकांत अवघ्या ११४ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्या संघाकडून इब्राहिम झादरानने सर्वाधिक (३८) धावा केल्या. याव्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. वेस्ट इंडिजकडून ओबेड मॅककॉयने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर अकिल हुसैन (२), गुडाकेश मोती (२), आंद्रे रसेल (१) आणि अल्झारी जोसेफने (१) बळी घेतला.

तत्पुर्वी, नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने यजमानांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. निकोलस पूरनने स्फोटक खेळी करून फॉर्ममध्ये असलेल्या अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. निकोलस पूरनच्या ९८ धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानला तगडे लक्ष्य दिले. विश्वचषकाच्या सुरुवातीपासून चांगली कामगिरी करत असलेल्या अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंना 'पूरन' वादळ रोखता आले नाही. विजयाचा चौकार मारण्यासाठी अफगाणिस्तानसमोर २१९ धावांचे विशाल आव्हान आहे. वेस्ट इंडिजने निर्धारित २० षटकांत ५ बाद २१८ धावा केल्या. निकोलस पूरनशिवाय जॉन्सन चार्ल्सने चांगली खेळी केली. त्याने २७ चेंडूत ४३ धावा कुटल्या. पूरनला अवघ्या २ धावांमुळे शतकापासून दूर राहावे लागले. त्याने ८ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ५३ चेंडूत ९८ धावांची अप्रतिम खेळी केली. पण, अखेरच्या षटकात तो धावबाद झाल्याने त्याला शतकापासून लांब राहावे लागले. अफगाणिस्तानकडून गुलाबदीन नायबने सर्वाधिक (२) बळी घेतले, तर अजमतुल्लाह उमरजई आणि नवीन-उल-हक यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. 

अफगाणिस्तानचा संघ - राशिद खान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरान, गुलाबदीन नैब, अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह झादरान, करीम जनत, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी.

वेस्ट इंडिजचा संघ - रोवमन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन, शाई होप, शेरफन रूदरफोर्ड, आंद्रे रसेल, अकील हुसैन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, ओबेड मॅककॉय. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024वेस्ट इंडिजअफगाणिस्तान