WI vs ENG 4th T20I (Marathi News) : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी काल दुबईत लिलाव पार पडला आणि त्यात पॅट कमिन्स व मिचेल स्टार्कसह अनेकांवर कोट्यवधींचा वर्षाव झालेला पाहायला मिळाला. एकूण ७२ खेळाडूंवर बोली लावली गेली आणि २३०.४५ कोटी खर्च केले गेले. पण, आयपीएलच्या लिलावाआधी आणि नंतर शतक झळकावणारा इंग्लंडचा फिल सॉल्ट ( Phil Salt ) अनसोल्ड राहिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. वेस्ट इंडिज दौऱ्यावरील सलग दोन ट्वेंटी-२० सामन्यांत सॉल्टने शतक झळकावली आणि काल त्याने ऐतिहासिक कामगिरी केली.
- आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त दोन शतकं झळकावणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू- इंग्लंडकडून सलग दोन सामन्यांत शतक झळकावणारा पहिला फलंदाज- एकाच ट्वेंटी-२० मालिकेत दोन शतकं करणारा पहिला फलंदाज - ४ दिवसांत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत दोन शतकं, मालिकेत सर्वाधिक धावा
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा ट्वेंटी-२० सामना काल झाला. यष्टिरक्षक-फलंदाज फिल सॉल्ट व कर्णधार जोस बटलर यांनी विंडीजच्या गोलंदाजांना झोडून काढले. दोघांनी पहिल्या ९.५ षटकांत ११७ धावांची भागीदारी केली. बटलर २९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारासह ५५ धावांवर बाद झाला. विल जॅक्सने ९ चेंडूंत २४ धावांचा पाऊस पाडला. सॉल्टने ५७ चेंडूंत ७ चौकार व १० षटकारांसह ११९ धावांची वादळी खेळी करून संघाला २० षटकांत ३ बाद २६७ धावांचा पल्ला गाठून दिला. लिएम लिव्हिंगस्टोनने २१ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ५४ धावा कुटल्या.
वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ १५.३ षटकांत १९२ धावांत तंबूत परतला. आंद्रे रसेलने २५ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ५१ धावांची खेळी केली. निकोलस पूरन ( ३९) व शेर्फाने रुथरफोर्ड ( ३६) यांच्या व्यतिरिक्त विंडीजच्या अन्य फलंदाजांनी निराश केले. इंग्लंडच्या रिसे टॉप्लीने ३, सॅम कुरन व रेहान अहमद यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. इंग्लंडने ७२ धावांनी हा सामना जिंकला.
फिल सॉल्टची कारकीर्द
- वन डे - ६१९ धावा, ३६.४ सरासरी, १३३.४ स्ट्राईक रेट
- ट्वेंटी-२० - ६०१ धावा, ३५.४ सरासरी, १६५.६ स्ट्राईक रेट
- आयपीएल - २१८ धावा, २७.३ सरासरी, १६३.९ स्ट्राईक रेट
- विंडीजविरुद्धच्या मालिकेत २९३ धावा, ९७.७ सरासरी, १८७.८ स्ट्राईक रेट