Ben Stokes Emotional Tribute, WI vs ENG: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचा गेल्या वर्षभराचा वैयक्तिक जीवनातील आणि मैदानावरील काळ खूपच कठीण होता. मात्र वर्षानंतर आता तो आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतण्याची चिन्हं दिसली. बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे सुरू असलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध १२८ चेंडूंमध्ये १२० धावांची जबरदस्त खेळी केली. त्याने आपली खेळी ११ चौकार आणि सहा षटकारांसह सजवली. या कामगिरीसह ५ हजार धावा आणि १५० बळी अशी दुहेरी कामगिरी करणारा तो कसोटी क्रिकेट इतिहासातील पाचवा खेळाडू ठरला. त्याने गॅरी सोबर्स, इयन बोथम, कपिल देव आणि जॅक कॅलिस यांच्या पंगतीत स्थान मिळवले. दमदार शतक झळकावल्यानंतर भावनिक झालेल्या स्टोक्सने आपली खेळी दिवंगत वडिलांना समर्पित केली. पाहा स्टोक्सच्या शतकानंतरचा व्हिडीओ-
डिसेंबर २०२० मध्ये स्टोक्सचे वडिल गेड यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर स्टोक्सचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पहिलंच शतक होतं. त्यामुळे स्टोक्सने त्याचे मधले बोट वाकवून आकाशाकडे पाहत त्यांचं स्मरण केलं आणि त्यांना शतक समर्पित केलं. स्टोक्सने यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की तो मधलं बोट वाकवून सेलिब्रेशन करण्याचं कारण काय... १९८०च्या दशकात रग्बी खेळताना अनेक दुखापतींमुळे स्टोक्सच्या वडिलांचे एक बोट कापून टाकावे लागले होते. त्यामुळे तो तसं सेलिब्रेशन करतो. २०२० मध्ये दीर्घ आजारानंतर गेड यांचे निधन झाले.
स्टोक्सने ही खेळी त्याच्या सर्वात लक्षात राहणाऱ्या खेळींपैकी एक असल्याचं सांगितलं. शतक केल्यानंतर आपल्या दिवंगत वडिलांचं स्मरण करणं हा खूपच भावूक करणारा क्षण होता असं तो म्हणाला. तसेच, ती भावना मनाला सुखावणारी होती, असं त्याने सांगितलं. दरम्यान, इंग्लंड-वेस्ट इंडिज पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या कसोटीतील २ दिवसांचा खेळ पूर्ण झाला असून इंग्लंडने पहिल्या डावात ९ बाद ५०७ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिजने १ बाद ७१ धावांपर्यंत मजल मारली.
Web Title: WI vs Eng Ben Stokes pays emotional tribute to late father after scoring first century post his death watch video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.