West Indies vs England, T20I Rovman Powell : दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत अवघ्या १ धावेनं पराभव पत्करावा लागल्यानंतर यजमान वेस्ट इंडिजनं दमदार पुनरागमन केले. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांप्रती कोणतीच दया-माया न दाखवता त्यांनी धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात रोव्हमन पॉवेलनं षटकारांची आतषबाजी करताना शतक झळकावले. ख्रिस गेल व एव्हिन लुईस यांच्यानंतर ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा तो विंडीजचा तिसरा फलंदाज ठरला. वेस्ट इंडिजनं हा सामना २० धावांनी जिंकून ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.
प्रथम फलंदाजीला आलेल्य विंडीजचे सलामीवीर ब्रँडन किंग ( १०) व शे होप ( ४) हे झटपट माघारी परतले. पण, इंग्लंडसमोर पुढे मोठे संकट उभे राहिले. निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल या दोघांनी चौकारांची नव्हे तर षटकारांचा पाऊस पाडला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १२२ धावांची विक्रमी भागीदारी केली. फॉर्माशी झगडणाऱ्या पूरननं ४३ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांच्या मदतीनं ७० धावा चोपल्या. दुसरीकडे पॉवेलनं ५१ चेंडूंत शतक पूर्ण करताना इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानं ५३ चेंडूंत ४ चौकार व १० षटकारांच्या मदतीनं १०७ धावांची विक्रमी खेळी केली. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं २० षटकांत ५ बाद २२४ धावांचा डोंगर उभा केला.
इंग्लंडच्या फलंदाजांनीही विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही. टॉम बँटन आणि फिल सॉल्ट वगळल्यास एकाही फलंदाजानं २० धावांचा टप्पा ओलांडला नाही. बँटन ३९ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ७३ धावा करून बाद झाला, तर सॉल्टनं २४ चेंडूंत ५७ धावा कुटल्या. त्यात ३ चौकार व ५ षटकारांचा समावेश होता. इंग्लंडने ९ बाद २०४ धावांपर्यंत मजल मारली. रोमारिओ शेफर्डनं ४ षटकांत सर्वाधिक ५९ धावा दिल्या, परंतु त्याने ३ विकेट्सही घेतल्या. किरॉन पोलार्डनं २ विकेट घेतल्या.
वेस्ट इंडिजचा संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे आणि येथे ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका ते खेळणार आहेत. विंडीजच्या खेळाडूंची फटकेबाजी पाहता भारतासाठी ते तगडं आव्हान उभं करतील असा अंदाज आहे.
Web Title: WI vs ENG, T20I - Rovman Powell becomes the third West Indian to score a T20I hundred, 107 from 53 balls including 4 fours and 10 sixes, Windis won by 20 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.