वेस्ट इंडिजविरूद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले. तिसरा आणि चौथा सामना जिंकून हार्दिकसेनेने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. १७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी अप्रतिम खेळी करून सामना एकतर्फी केला. पहिल्या विकेटसाठी १६५ धावांची ऐतिहासिक भागीदारी नोंदवून त्यांनी भारताला विजय मिळवून दिला. शुबमन गिलने ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ४७ चेंडूत ७७ धावा केल्या.
गिलशिवाय यशस्वी जैस्वालने देखील अप्रितम खेळी केली. जैस्वालने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये आपले पहिले अर्धशतक झळकावून भविष्यातील स्टार असल्याचे दाखवून दिले. जैस्वालने ३ षटकार आणि ११ चाैकारांच्या मदतीने ५१ चेंडूत नाबाद ८४ धावा केल्या. शनिवारी झालेला सामना जिंकून भारताने विजय मिळवून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे रविवारी होणारा सामना निर्णायक असेल.
वेस्ट इंडिजकडून शिमरॉन हेटमायर (६१) आणि शाई होप (४५) यांनी शानदार खेळी करून भारतीय संघासमोर सन्मानजनक आव्हान उभे केले. विडिंजने निर्धारित २० षटकांत ८ बाद १७८ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी १७९ धावांची गरज होती. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी ऐतिहासिक खेळी करून विजयावर शिक्कामोर्तब केला. सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा धारण केलेल्या वेस्ट इंडिजला रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. पण, हेटमायरने ३९ चेंडूत ६१ धावांची संयमी खेळी करून सामन्यात रंगत आणली.
भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर कुलदीप यादव (२) आणि अक्षर पटेल, युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. तत्पुर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला गोलंदाजी करण्यास सांगितले. आज या मालिकेतील चौथा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल इथे खेळवला गेला.