Join us  

 यशस्वीने अर्धशतक झळकावताच रचला इतिहास; रोहित शर्माचा १४ वर्ष जुना 'किल्ला' उद्ध्वस्त

WI vs IND 2023, 4th T20I : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा ट्वेंटी-२० सामना खेळवला गेला.

By ओमकार संकपाळ | Published: August 13, 2023 12:58 AM

Open in App

भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याला सलामीच्या सामन्यात स्वस्तात माघारी परतावे लागले होते. पण, दुसऱ्याच सामन्यात जैस्वालने आपली प्रतिभा दाखवून दिली. त्याने वेस्ट इंडिजविरूद्धच्या चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात ५१ चेंडूत ८४ धावांची नाबाद खेळी केली. ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने युवा खेळाडूने ही किमया साधली. लक्षणीय बाब म्हणजे यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी पहिल्या बळीसाठी १६५ धावांची भागीदारी नोंदवली. वेस्ट इंडिजने दिलेल्या १७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारताने सहज केला आणि ९ गडी राखून मोठा विजय साकारला. 

'यशस्वी' खेळीचौथ्या सामन्यातील विजयासह भारताने २-२ ने मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे उद्या होणारा अखेरचा सामना निर्णायक असेल. खरं तर यशस्वी जैस्वालने ३३ चेंडूत अर्धशतक झळकावून इतिहास रचला आहे. तसेच त्याने भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचा १४ वर्षाचा जुना विक्रम मोडीत काढला. यशस्वी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. त्याने २१ वर्ष आणि २२७ दिवसांच्या वयात या विक्रमाला गवसणी घातली. तर, रोहितने २२ वर्ष आणि ४१ दिवसांच्या वयात हा कारनामा केला होता. त्याने २००९ मध्ये हे अर्धशतक झळकावले होते. 

दरम्यान, भारताकडून ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक करण्याचा विक्रम आजही रोहितच्या नावावर आहे. रोहितने २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २० वर्षे १४३ दिवसांचा असताना नाबाद ५० धावा केल्या होत्या. या यादीत मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २० वर्ष २७१ या वयात ही कामगिरी केली होती. 

भारताचा सलग दुसरा विजय वेस्ट इंडिजविरूद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले. तिसरा आणि चौथा सामना जिंकून हार्दिकसेनेने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. १७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी अप्रतिम खेळी करून सामना एकतर्फी केला. पहिल्या विकेटसाठी १६५ धावांची ऐतिहासिक भागीदारी नोंदवून त्यांनी भारताला विजय मिळवून दिला. शुबमन गिलने ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ४७ चेंडूत ७७ धावा केल्या. शनिवारी झालेला सामना जिंकून भारताने विजय मिळवून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे रविवारी होणारा सामना निर्णायक असेल. 

टॅग्स :यशस्वी जैस्वालभारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ
Open in App