आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे. मालिकेत २-१ ने आघाडीवर असलेल्या कॅरेबियन संघाने आज देखील आपली चमक दाखवली. शिमरॉन हेटमायर (६१) आणि शाई होप (४५) यांनी शानदार खेळी करून भारतीय संघासमोर सन्मानजनक आव्हान उभे केले. विडिंजने निर्धारित २० षटकांत ८ बाद १७८ धावा केल्या. त्यामुळे भारताला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी १७९ धावांची गरज आहे. सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा धारण केलेल्या वेस्ट इंडिजला रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. पण, हेटमायरने ३९ चेंडूत ६१ धावांची संयमी खेळी करून सामन्यात रंगत आणली.
भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर कुलदीप यादव (२) आणि अक्षर पटेल, युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. तत्पुर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला गोलंदाजी करण्यास सांगितले. आज या मालिकेतील चौथा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल इथे खेळवला जात आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.
आजच्या सामन्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ - रोवमन पॉवेल (कर्णधार), निकोलस पूरन, शाई होप, ब्रँडन किंग, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, कायस मेयर्स, ओडिन स्मिथ, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, ओबेड मॅकॉय.