Irfan Pathan, IND vs WI Series : BCCI ने आज आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वन डे संघ जाहीर केला आणि त्यात शिखर धवनकडे ( Shikhar Dhawan) नेतृत्व सोपवण्यात आले आहे. रवींद्र जडेजाकडे या मालिकेत उप कर्णधारपदाची जबाबदारी असेल. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत व रोहित शर्मा यांना वन डे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. नुकताच भारतीय संघात पुनरागमन करणारा आणि आयर्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत नेतृत्व सांभाळणाऱ्या हार्दिक पांड्यालाही विश्रांती दिली गेली आहे. संजू सॅमसन, शुबमन गिल, अर्षदीप सिंग व आवेश खान यांना वन डे संघात पदार्पणाची संधी मिळाली आहे.
७ ते १७ जुलै या कालावधीत इंग्लंडविरुद्धची मालिका आहे आणि पाच दिवसांनंतर म्हणजेच २२ ते २७ जुलै या कालाधीत भारतीय संघ विंडीजविरुद्ध तीन वन डे सामने खेळणार आहे. सततच्या मालिकेमुळे निवड समितीने विराट, रोहित व जसप्रीत यांना विश्रांती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेतही या सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली गेली होती. त्यानंतर आयर्लंडविरुद्धच्या दोन ट्वेंटी-२० सामन्यातही ते खेळले नव्हते. विराट, रिषभ पंत व जसप्रीत हे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत खेळल्यामुळे त्यांना पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात विश्रांती दिली गेली आहे.
निवड समितीच्या या संघ निवडण्याच्या प्रक्रियेवर भारताचा माजी गोलंदाज इऱफान पठाण याने टीका केली आहे. विश्रांती घेतल्यानंतर कुणाचा फॉर्म परतत नाही, असे विधान त्याने केले आहे. भारताचा संघ विंडीजविरुद्ध नंतर ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि त्यात हे सीनियर खेळाडू खेळतील अशी अपेक्षा आहे.