WI vs IRE, 2nd ODI, ICC Men's Cricket World Cup Super League 2022 : आयर्लंड संघानं पावसानं बाधित झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजवर ( Ireland Vs West Indies) ५ विकेट्सनं पराभूत करताना तीन वन डे सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं विजयासाठी २३० धावांचे लक्ष्य ठेवले. आयर्लंड लक्ष्याचा पाठलाग करताना पावसाची सुरुवात झाली. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडला विजयासाठी ३६ षटकांत १६८ धावा करायच्या होत्या. हॅरी टेक्टर आणि अँडी मॅकब्राईन यांनी दमदार खेळ करताना ५ विकेट गमावून ३३ षटकांत हे लक्ष्य पार केले.
सलामीवीर विलियम पोटरफिल्ड व कर्णधार पॉल स्टर्लिंग यांनी पहिल्या विकेटसाठी ३७ धावा जोडल्या. पोटरफिल्ड २६ आणि स्टर्लिंग २१ धावांवर बाद झाले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मॅकब्राईननं ३५ धावा केल्या, तर चौथ्या क्रमांकाला आलेल्या टेक्टरनं ५४ धावा बनवून नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून अकील हुसैननं दोन, रॉस्टन चेस, रोमारियो शेफर्ड व कर्णधार किरॉन पोलार्ड यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
याआधी प्रथम करताना वेस्ट इंडिजचा डाव २२९ धावांवर गडगडला. विंडिजनं १११ धावांवर ७ विकेट्स गमावल्या. त्याचवेळी रोमारियो शेफर्डनं ४१ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीनं ५० धावा केल्या. दुसऱ्या बाजूनं ओडियन स्मिथनं १९ चेंडूंत ४७ धावांची खेळी केली. त्यानं दोन चौकार व पाच षटकार खेचले. आयर्लंडकडून मॅकब्राईननं ३६ धावांत ४ विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त क्रेग यंगनं ४२ धावांत ३ विकेट्स व जोश लिटिलनं २ विकेट्स घेतल्या.
आयर्लंडनं या विजयासह वर्ल्ड कप सुपर लीगमध्ये ५८ गुणांची कमाई केली आहे. वेस्ट इंडिजच्या खात्यात ५० गुण आहेत. या गुणतालिकेत आयर्लंड चौथ्या क्रमांकावर आला आहे. क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ सुपर लीगमध्ये इंग्लंड, बांगलादेश व ऑस्ट्रेलिया अव्वल तीन स्थानांवर आहेत. भारतीय संघ सहाव्या क्रमांकावर आहे.