नवी दिल्ली : वेस्टइंडिज (West Indies) क्रिकेट संघ सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. संघाला एकापोठापाठ एक मालिका गमवावी लागत आहे. भारताविरूद्ध झालेल्या पराभवानंतर विंडीजच्या संघाला किवीच्या संघाने देखील मात दिली आहे. टी-२० मालिका गमावली असली तरी वेस्टइंडिजच्या संघाने आपल्या पराभवाचा दुष्काळ अखेर संपवला आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या टी-२० सामन्यात मिळवलेल्या विजयाने विंडीजने लाजिरवाणा विक्रम मोडीत काढला. ८ वर्षांनंतर वेस्टइंडिजने न्यूझीलंडच्या (New Zealand) संघाला टी-२० सामन्यात पराभूत केले आहे. मात्र विंडीजच्या संघाला टी-२० मालिका गमवावी लागली आहे.
न्यूझीलंडविरूद्ध विंडीजच्या संघाने शेवटचा टी-२० सामना २०१४ मध्ये जिंकला होता. यानंतर एकदाही न्यूझीलंडच्या संघाला पराभूत करण्यात यश आले नव्हते. विशेष म्हणजे १०१४ नंतर अवघ्या ३ मालिका या दोन संघांमध्ये झाल्या असून तिन्ही मालिकेवर न्यूझीलंडचे वर्चस्व राहिले होते. दोन्ही देशांमध्ये एकूण १९ सामने झाले आहेत, ज्यामध्ये ११ सामन्यात न्यूझीलंडचा संघाने बाजी मारली आहे तर फक्त ६ सामने विंडीजच्या संघाला जिंकता आले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात वेस्टइंडिजने ८ बळी राखून मोठा विजय मिळवला.
तब्बल ८ वर्षांचा संपला दुष्काळया सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना किवीच्या संघाने २० षटकात ७ गडी गमावून १४५ धावा केल्या होत्या. ग्लेन फिलिप्स (४१) आणि कर्णधार विलियमसनच्या (२४) अशा खेळीमुळे संघाला साजेशी धावसंख्या उभारता आली. तर कॅरेबियन संघाकडून ओडियन स्मिथने ३ आणि अकील हुसैनने २ बळी पटकावून किवीच्या संघाची कंबर मोडली. दुसऱ्या डावात विंडीजच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा दाखवून सहज विजय मिळवला. वेस्टइंडिजकडून शामर्ह ब्रूक्सने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली तर ब्रँडन किंगने ५३ धावा करून वेस्टइंडिजच्या पराभवाचा दुष्काळ संपवला.