ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी (PNG) हे संघ भिडले. नवख्या पीएनजीच्या संघाने विडिंजच्या बलाढ्य संघाला सळो की पळो करून सोडले. विजय हाती लागला नसला तरी त्यांनी दिलेले आव्हान पाहून कॅरेबियन खेळाडूंनी बोलकी प्रतिक्रिया दिली. या स्पर्धेत कोणत्याच संघाला हलक्यात घ्यायला नको, असे प्रतिपादन सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि सामनावीर पुरस्काराचा मानकरी रोस्टन चेसने केले. रंगतदार झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने ५ गडी आणि ६ चेंडू राखून विजय साकारला.
यजमान वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून पापुआ न्यू गिनीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यांनी संथ खेळी करत २० षटकांत ८ बाद १३६ धावा केल्या. सेसे बाऊ वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. बाऊने १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ४३ चेंडूत ५० धावा कुटल्या. वेस्ट इंडिजकडून आंद्रे रसेल आणि अल्झारी जोसेफ यांनी २-२ बळी घेतले, तर अकील हुसैन, रोमारियो शेफर्ड आणि गुडाकेश मोती यांना १-१ बळी घेता आला.
यजमानांची विजयी सलामीप्रतिस्पर्धी संघाने दिलेल्या १३७ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना कॅरेबियन संघाला चांगलाच संघर्ष करावा लागला. पीएनजीचा कर्णधार असद वालाने दोन बळी घेऊन यजमानांना अडचणीत आणले. त्याच्याशिवाय एलेई नाओ, चॅड सोपर आणि जॉन करिको यांनी १-१ बळी घेतला. वेस्ट इंडिजच्या फंलदाजांनी सांघिक कामगिरी करताना विजयी सलामी दिली. स्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या कॅरेबियन फलंदाजांनी आपल्या सलामीच्या सामन्यात मात्र संथ खेळीचे प्रदर्शन केले. ब्रँडन किंग (३४), निकोलस पूरन (२७), रोस्टन चेस (नाबाद ४२ धावा), रोवमॅन पॉवेल (१५) आणि आंद्रे रसेलने नाबाद १५ धावा करून विडिंजच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.