WI vs SA T20 : सध्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजाने शतक ठोकून इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिजच्या जॉन्सन चार्ल्सने षटकारांचा वर्षाव करत वेस्ट इंडिजसाठी सर्वात जलद शतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना घाम फोडून जॉन्सन चार्ल्स विंडीजकडून ट्वेंटी-20 मध्ये सर्वात जलद शतक करणारा फलंदाज बनला आहे. चार्ल्सने अवघ्या 39 चेंडूत 100 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना विंडीजच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 258 एवढ्या धावांचा डोंगर उभारला.
ख्रिस गेलचा विक्रम मोडीतया शतकासह या फलंदाजाने वेस्ट इंडिजचा सर्वात स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. गेलने वानखेडे मैदानावर 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध 47 चेंडूत वेस्ट इंडिजसाठी सर्वात जलद शतक झळकावले होते.
वेस्ट इंडिजने ठोकले 22 षटकार जॉन्सन चार्ल्सने एका डावात 11 षटकार मारून गेलची बरोबरी केली आहे. याशिवाय वेस्ट इंडिजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एकाच डावात एका संघाकडून सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विंडीज संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध एकूण 22 षटकार ठोकले. यामध्ये चार्ल्सने 11, शेफर्डने 4, काइल मेयर्सने 4 आणि रोव्हमन पॉवेलने 2 आणि ओडियन स्मिथने 1 षटकार ठोकला आहे. यापूर्वी अफगाणिस्तानने 2019 मध्ये आयर्लंडविरुद्ध सर्वाधिक 22 षटकार ठोकले होते.
वेस्ट इंडिजसाठी सर्वात वेगवान ट्वेंटी-20 शतक
- जॉन्सन चार्ल्स - 39 चेंडू विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- ख्रिस गेल - 47 चेंडूत विरुद्ध इंग्लंड
- एविन लुईस - 48 चेंडूत विरूद्ध भारत
- ख्रिस गेल - 50 चेंडू विरूद्ध दक्षिण आफ्रिका विरुद्ध
- रोव्हमन पॉवेल - 51 चेंडू विरुद्ध इंग्लंड
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"