हरारे - विश्वकप 2019 च्या उर्वरित दोन स्थानांसाठी 10 संघांदरम्यान सुरु असलेल्या आयसीसी विश्वकप पात्रता स्पर्धेत दोनदा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या वेस्ट इंडिज संघाच्या मदतीला पाऊस धावून आला. पात्रता फेरीच्या सुपर-सिक्स सामन्यात डकवर्थ लुईस नियमाच्या जोरावर वेस्ट इंडिजने स्कॉटलंडवर पाच धावांनी विजय मिळवला आहे.
नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर दोन वेळच्या विजेत्या वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 48.4 षटकांत 198 धावा केल्या होत्या. स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत बलाढ्या वेस्ट इंडिजला 200 धावांच्या आत रोखले. वेस्ट इंडिजने दिलेल्या 199 धावांचा पाठलाग करणाऱ्या स्कॉटलंड संघाने 25.2 षटकांमघध्ये पाच बाद 125 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी मैदानावर पावसाने हजेरी लावली. त्यावेळी म्युनसी (32) आणि लीस्क (14) धावांवर खेळत होते. अखेर पाऊस थांबत नसल्याने पंचांनी डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल लावला. त्यावेळी रनरेटच्या आधारावर पंचानी वेस्ट इंडिज संघाला अवघ्या पाच धावांनी विजयी घोषीत केले. वेस्ट इंडिजकडून सलामीवीर लुईसने 87 चेंडूत सर्वाधिक 66 धावांची खेळी केली तर मार्लन सॅम्युल्सने 98 चेंडूत 51 धावांची खेळी केली. विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलला भोपळाही फोडता आला नाही. स्कॉटलंडकडून शरीफ आणि व्हिलने प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या.
या पराभवासोबतच स्कॉटलंड संघाचा सलग दुसऱ्यावेळी आणि 1999 नंतर नंतर चौथ्यांदा विश्वकप खेळण्याच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. यूएई आणि जिम्बाब्वे यांच्यात आज गुरुवारी होणाऱ्या सामन्यामध्ये पावसाने हजेरी लावली तर अफगानिस्तान आणि आयर्लंड हे दोन्ही संघ विश्वचषक खेळण्याच्या स्पर्धेत असतील. यूएई आणि जिम्बाब्वे यांच्यातील सामना पावसामुळं रद्द झाला तर वेस्ट इंडिजनंतर दुसरा संघ रनरेटच्या आधारावर घेतला जाईल.
वेस्ट इंडिजव्यतिरिक्त अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वे या संघांना ३० सप्टेंबर २०१७ च्या निर्धारित कालावधीपर्यंत आयसीसी वन-डे रँकिंगमध्ये अव्वल आठमध्ये स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे विश्वकप २०१९ साठी त्यांना थेट पात्रता मिळवता आली नाही.