नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. एकीकडे या स्पर्धेतील सराव सामने खेळवले जात आहेत, तर दुसरीकडे सुपर-12 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 8 संघ आमनेसामने आहेत. आज ब गटातील वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यात सामना पार पडला. वेस्ट इंडिजच्या संघाने सांघिक खेळी करून 'करा किंवा मरा'च्या सामन्यात बाजी मारली आहे. त्यामुळे विंडिजच्या संघाची विश्वचषकात खेळण्याची आशा कायम राहिली आहे. वेस्ट इंडिजने 31 धावांनी विजय मिळवून स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवले आहे. खरं तर वेस्ट इंडिजला आपल्या पहिल्या सामन्यात नवख्या स्कॉटलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
तत्पुर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना विडिंजच्या संघाने सावध खेळी करून 20 षटकांत 7 बाद 153 धावा केल्या. जॉनसन चार्ल्सने सर्वाधिक 45 धावांची खेळी करून झिम्बाब्वेला विजयासाठी 154 धावांचे आव्हान दिले. त्याच्याव्यतिरिक्त पॉवेलने 28 धावांची खेळी केली. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी घातक गोलंदाजी करून विडिंजला कडवे आव्हान दिले. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने सर्वाधिक 3 बळी पटकावले, तर ब्लेसिंग मुजरबानी (2) आणि शॉन विल्यम्सला (1) बळी घेण्यात यश आले.
झिम्बाब्वेला केलं चितपट वेस्ट इंडिजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या फलंदाजांना पूर्णपणे अपयश आले. कोणत्याच फलंदाजाला वैयक्तिक 30 धावांचा आकडा गाठता आला नाही. झिम्बाब्वेकडून ल्यूक जोंगवेने सर्वाधिक (29) तर सलामीवीर वेस्ली मधेवरेने (27) धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफसने सर्वाधिक 4 बळी पटकावले. याव्यतिरिक्त जेसन होल्डर (3) आणि अकेल हुसैन, ओबेद मॅकॉय आणि ओडियन स्मिथ यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. लक्षणीय बाब म्हणजे अल्झारी जोसेफने 4 षटकांत केवळ 16 धावा देऊन 4 बळी पटकावले. अखेर झिम्बाब्वेचा संघ पूर्ण 20 षटके देखील खेळू शकला नाही. वेस्ट इंडिजच्या आक्रमक माऱ्यासमोर झिम्बाब्वेचा संघ 18.2 षटकांत 122 धावांवर सर्वबाद झाला.
टी-20 विश्वचषकात सुपर-12 फेरी गाठण्यासाठी आठ संघांमध्ये सामने खेळवले जात आहे. हे आठ संघ दोन गटात आमनेसामने असतील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-12 सामन्यांसाठी पात्र ठरतील. यामध्ये नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँडचे संघ अ गटात खेळतील, तर ब गटात आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ असतील.
पहिला राउंड अ गट - नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँड.
ब गट - आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे.
सुपर-12 फेरीगट 1 - अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अ गटातील विजेता आणि ब गटातील उपविजेता.
गट 2 - बांगलादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अ गटातील उपविजेता आणि ब गटातील विजेता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"