WI vs ZIM Test : वेस्ट इंडिजचा युवा सलामीवीर तेगनारिन चंद्रपॉलने झिम्बाब्वेविरुद्ध द्विशतक ठोकले. तेगनारायणने त्याचे वडील शिवनारायण चंद्रपॉल यांचा विक्रम मोडला. वेस्ट इंडिजचा महान फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा तेगनारायण याने झिम्बाब्वेविरुद्ध बुलावायो कसोटीत शानदार द्विशतक झळकावले. तेगनारायणने नाबाद २०७ धावांची खेळी करताना अनेक विक्रम मोडले. वेस्ट इंडिजने ६ बाद ४४७ धावांवर डाव घोषित केला.
तेगनारायण चंद्रपॉलचे हे द्विशतक ऐतिहासिक आहे. कसोटीत द्विशतक झळकावणारी ही क्रिकेट इतिहासातील दुसरी पिता-पुत्राची जोडी ठरली आहे. शिवनारायण चंद्रपॉलनेही कसोटीत द्विशतक झळकावले होते आणि आता त्याच्या मुलानेही हा पराक्रम केला आहे. त्याआधी पाकिस्तानच्या हनिफ मोहम्मद व शोएब मोहम्मद यांनी द्विशतकी खेळी केली होती.
तेगनारायणने षटकार ठोकून आपले द्विशतक पूर्ण केले. त्याने हा पराक्रम ४६५ चेंडूत केला. वेस्ट इंडिजकडून हे सर्वात संथ द्विशतक ठरले. तेगनारायणनेही त्याचे वडील शिवनारायण यांच्या कसोटीतील सर्वोत्तम धावांचा विक्रम मोडला. त्याने नाबाद २०७ धावा करताना त्याच्या वडिलांची कसोटीतील सर्वोच्च २०३ धावसंख्येचा विक्रम मोडला. तेगनारायण हा २०१०नंतर परदेशात द्विशतक झळकावणारा वेस्ट इंडिजचा दुसरा सलामीवीर ठरला. यापूर्वी २०१० मध्ये ख्रिस गेलने श्रीलंकेविरुद्ध ३३३ धावांची खेळी केली होती.
शिवनारायण याने १३६ डावांनंतर कसोटीतील पहिले द्विशतक झळकावले होते. त्याआधी त्याने ५०००+ धावा केल्या होत्या, १२०००+ चेंडूंचा सामना केला होता आणि ११ वर्षांचा अनुभव त्याच्या गाठीशी होता. पण, तेगनारायण याने त्याच्या ५ व्या डावात द्विशतक झळकावले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"