भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेत टीम इंडियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या मालिकेतील दुसरा सामना ऐतिहासिक ठरला. कोलकाताच्या इडन गार्डनवर टीम इंडियानं प्रथमच डे नाइट कसोटी सामना खेळला आणि अवघ्या अडीच दिवसांत तो जिंकलाही. भारतानं हा सामना एक डाव व 46 धावांनी जिंकला. भारतानं या विजयासह सलग चार कसोटी सामन्यांत डावानं विजय मिळवण्याचा विक्रम नावावर केला. या सामन्यानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारतीय संघाचा यष्टिरक्षक वृद्धीमान साहा दुखापतग्रस्त झाला आहे आणि आता त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया होणार आहे.
बांगलादेशनंतर भारतीय संघ 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-20 मालिकेत वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने माघार घेतली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेच्या सामन्यात धवननं स्वतःला दुखापतग्रस्त करून घेतलं आणि आता विंडीज मालिकेत त्याच्या जागी संघात संजू सॅमसनचा समावेश करून घेतला. या बातमी पाठोपाठ साहाच्या दुखापतीचे वृत्त भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) जाहीर केले.