Sachin Tendulkar Birthday Arjun Tendulkar IPL Debut: यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ विजयाचे खाते उघडण्यासाठी धडपडत आहे. स्पर्धा सुरू झाल्यापासून सातच्या सात सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आज मुंबईचा आठवा सामना होणार आहे. याच हंगामात आधी एकदा पराभूत झालेल्या लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध (MI vs LSG) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता सामना रंगणार आहे. मुंबई संघासाठी आजचा दिवस खूप खास आहे. संघाचे मार्गदर्शक आणि महान खेळाडू सचिन तेंडुलकर आज ४९ वर्षांचा झाला आहे. या निमित्ताने मुंबईचा संघ सचिनला वाढदिवसाची खास भेट देऊ शकतो. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आज लखनौ विरुद्धच्या सामन्यात मुंबईकडून पदार्पण करू शकतो. आपल्या वाढदिवशी आपल्या मुलाचे IPL पदार्पण होणे, ही सचिनसाठी बेस्ट गिफ्ट नक्कीच असू शकते. (Happy Birthday Sachin)
मुंबई संघात एक बदल होण्याची शक्यता
यंदाच्या हंगामात विजयासाठी आसुसलेल्या मुंबई संघाच्या प्लेइंग-11 मध्ये बदल होऊ शकतो. कर्णधार रोहित शर्मा गोलंदाजीत हा बदल करू शकतो. जयदेव उनाडकटच्या जागी अर्जुन तेंडुलकरचा संघात समावेश करू शकतो. तसे झाले तर अर्जुनचा हा IPLमधील पदार्पण सामना असेल.
लखनौ संघातही एका बदलाची शक्यता
लखनौ संघाचा कर्णधार लोकेश राहुलदेखील आपल्या प्लेइंग-11 मध्ये बदल करू शकतो. हा बदल फलंदाजीच्या क्रमात होऊ शकतो. मुंबईविरुद्धच्या सामन्यात राहुल कृष्णप्पा गौतमला मैदानात उतरवू शकतो. यासाठी मनीष पांडेला वगळले जाऊ शकते.
मुंबईचा संभाव्य संघ- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), डेव्हॉल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, हृतिक शोकीन, जयदेव उनाडकट/अर्जुन तेंडुलकर, डॅनियल सॅम्स, रिले मेरेडिथ, जसप्रीत बुमराह.
लखनौचा संभाव्य संघ- लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे / कृष्णाप्पा गौतम, दीपक हुडा, कृणाल पांड्या, आयुष बडोनी, मार्कस स्टॉयनीस, जेसन होल्डर, दुष्मंथा चमिरा, आवेश खान आणि रवी बिश्नोई.