पुनरागमन करणारच... वेगवान गोलंदाज श्रीसंतचा निर्धार

बंदी उठताच रणजीतून पुनरागमन!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 08:08 PM2019-01-14T20:08:48+5:302019-01-14T20:09:38+5:30

whatsapp join usJoin us
Will come back ... fast bowler Sreesanth's determination | पुनरागमन करणारच... वेगवान गोलंदाज श्रीसंतचा निर्धार

पुनरागमन करणारच... वेगवान गोलंदाज श्रीसंतचा निर्धार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सचिन कोरडे : आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे बंदीची झळ सोसत असलेला भारतीय जलदगती गोलंदाज एस. श्रीसंत याला आपल्यावरील बंदी उठण्याबाबत विश्वास आहे. तो सकारात्मक निकालाच्या प्रतीक्षेत आहे. बंदी उठताच मी रणजी क्रिकेटमधून सुरुवात करेन. ही संधी गोव्याने जरी दिली तरी स्वीकारेन. आजही मी ताशी १४० किमी वेगाने चेंडू फेकू शकतो. त्यामुळे मला भारतीय संघात पुनरागमनाची आशा आहे. २०२१ मध्ये टी-२० विश्वचषकात खेळण्याचे स्वप्नं आहे, असेही श्रीसंत म्हणाला. 
‘नोमोझो’ या कार्यक्रमानिमित्त श्रीसंतला गोव्यात आमंत्रित करण्यात आले होते. श्रीसंत हा भाजपचा केरळचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मंत्री रोहन खंवटे यांनी त्याला खास आमंत्रित केले होते. श्रीसंत सध्या चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे. नुकताच बिग बॉस सिझन-१२ चा तो उपविजेता ठरला होता. या रिअ‍ॅलिटी शोमध्येही तो वादग्रस्त ठरला होता. 
भारतीय संघात तुला पुनरागमनाची कितपत आशा आहे? विचारल्यावर श्रीसंत म्हणाला की, मी सध्या क्रिकेटपासून दूर जरी असलो तरी माझे क्रिकेटप्रेम कमी झालेले नाही. पहिले प्राधान्य क्रिकेटलाच आहे. सध्या मी ३५ वर्षांचा आहे. आॅस्ट्रेलियाच्या ब्रॅडहॉगने चाळिशीनंतर पुनरागमन केले होते. मी तर फिट आहे आणि पूर्वीप्रमाणेच गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे बंदी उठताच मी रणजी खेळेन आणि त्यानंतर टीम इंडियासाठी प्रयत्न करेन. 
 

युवराज-श्रीसंत भेट; मात्र संवाद नाहीच...
भारतीय विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य युवराज सिंग आणि श्रीसंत हे दोघेही खूप वर्षांनंतर एकत्र आले. ‘नोमोझा’ या कार्यक्रमासाठी या दोघांनाही आमंत्रित करण्यात आले होते. युवराज सायंकाळी ६ वाजता आला तर श्रीसंत दुपारी ३ वाजल्यापासून कार्यक्रमात सहभागी झाला होता. कार्यक्रमस्थळी हे दोघेही एकत्र नव्हते; पण या दोघांची भेट झाली. गोव्याला निघण्यापूर्वी सुद्धा दोघांत चर्चा झाली होती. मात्र, ती औपचारिक होती. ‘युवराज पा... तुम कैसे हो? बाकी क्या चल रहा है...’ एवढाच आमच्यात संवाद झाल्याचे श्रीसंतने एका प्रश्नावर सांगितले.
 

मराठी चित्रपटातही झळकणार...
क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेला श्रीसंत आपल्या पिळदार शरीरयष्टीसाठी विशेष मेहनत घेत आहे. त्याला फॅशन आणि मनोरंजन या क्षेत्राची आवड आहे आणि म्हणूनच तो हॉलीवूड, बॉलीवूड चित्रपटांत पदार्पण करणार आहे. पूजा भट्टच्या एका चित्रपटातही तो लवकरच झळकणार आहे. बिग बॉसनंतर आपणास बºयाच आॅफर्स येत आहेत. मराठी चित्रपटाचाही प्रोजेक्ट तयार आहे. चित्रपटात मकरंद देशपांडे, आनंद माधवन हे दिग्गज असतील. मात्र, चित्रपटाबाबत २३ जानेवारीनंतर अधिकृरीत्या माहिती दिली जाईल. सध्या तरी मी याबाबत सांगू शकत नाही, असेही तो म्हणाला.
 

विराट फेव्हरेट.. धोनी खरंच कूल?
विराट कोहली हा माझा फेव्हरेट कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळायला मलाही आवडेल. त्याच्यातील आक्रमकता ही माझ्या स्वभावाला पटते. तो जसा आहे तसाच मैदानावर स्वत:ला सादर करतो. त्याच्यात उत्कृष्ट नेतृत्वगुण आहेत. त्याने संघाला वेगळ्या उंचीवर नेले आहे. धोनीला ‘कॅप्टन कूल’ हे नाव मीडियानेच दिले. एखादे नाव पडले की त्याचाच गाजवाजा केला जातो. धोनी मैदानावर आणि बाहेर, जसा आहे तसाच वागतो का? असा प्रतिकात्मक प्रश्न श्रीसंतने उभा केला. 
 

विश्वचषकासाठी भारत फेव्हरेट..
सध्याचा भारतीय संघ उत्कृष्ट आहे. संघात स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. गोलंदाजी, फलंदाजी यांचे चांगले मिश्रण आहे. भारत ‘अ’ आणि भारत ‘ब’ हे दोन्ही संघ जगात कोणत्याही संघाचा सामना करू शकतात. एवढे दर्जेदार खेळाडू असल्याने विश्वचषकाचा भारत हाच प्रबळ दावेदार आहे. या विश्वचषकात भारत-पकिस्तान हीच फायनल होईल, असे भाकीतही श्रीसंतने केले. भारत, दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रेलिया हे मजबूत संघ असल्याचे तो म्हणाला.

 
मोठ्या चुका करणारेही संघात... मग हार्दिक, पांड्यावर अन्याय का?
एका कार्यक्रमात हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांनी वादग्रस्त विधान केले. या विधानाचा मी निषेध करतो. टीव्ही शोमध्ये असे बोलणे योग्य नाही. आता तर बीसीसीआयची गाइडलाइन खूप कडक आहे. अशा बोलण्याने खेळाडूचे करिअर संपुष्टातही येऊ शकते. पुढे विश्वचषक आहे. हार्दिक आणि राहुल यांची संघाला गरज आहे. दोघेही मॅचविनर आहेत.त्यामुळे अशा खेळाडूंनी काळजी घ्यावी. मात्र दुसरीकडे, ज्या खेळाडूंनी या दोघांपेक्षाही मोठ्या चुका केल्या आहेत ते आज खेळत आहेत आणि ते सुद्धा या प्रकरणावर तोंडसुख घेत आहेत, असे श्रीसंत म्हणाला.

Web Title: Will come back ... fast bowler Sreesanth's determination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.