बंगळुरू : गतविजेत्या इंग्लंडला यंदाच्या विश्वचषकात आव्हान टिकविण्यासाठी कामगिरी सुधारण्यासह विजय मिळविण्याची गरज आहे. गुरुवारी त्यांची गाठ संघर्ष करीत असलेल्या श्रीलंकेविरुद्ध पडेल. इंग्लंडचे चार सामन्यांत दोन गुण असून ते नवव्या स्थानावर आहेत. लंकेविरुद्धचा विजय त्यांना गुणतालिकेत आघाडी मिळवून देणारा नसेल; पण त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यास आत्मविश्वास लाभेल.
लंकेविरुद्धचा पराभव म्हणजे आव्हान संपुष्टात! अशा वेळी पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी इंग्लंडच्या फलंदाजांना आक्रमक खेळावे लागेल. चिन्नास्वामीची सीमारेषा लहान असून खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक आहे. ऑस्ट्रेलिया-पाक या सामन्यात येथे ६७२ धावा निघाल्या. न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डेव्हिड मलान आणि ज्यो रूट यांचा अपवाद वगळता कुणीही फलंदाज लौकिकास साजेसा खेळ करू शकला नाही. अष्टपैलूंनी निराश केले. कर्णधार बटलरही अपयशी ठरला. रीस टॉपले यशस्वी गोलंदाज ठरला खरा; पण करंगळी फ्रॅक्चर झाल्यामुळे स्पर्धेबाहेर झाला. लेग स्पिनर आदिल राशीद याने मात्र आतापर्यंत सहा गडी बाद केले आहेत.
लंकेला नेदरलँड्सविरुद्ध ५ गड्यांनी मिळविलेल्या विजयात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. दासून शनाका व मथिशा पथिराना दुखापमुळे बाहेर पडले आहेत. त्यामुळे अनुभवी अँजेलो मॅथ्यूज हा दुष्मंता चामिरासोबत गोलंदाजी करेल. गोलंदाजी लंकेची कच्ची बाजू ठरत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४२८, पाकिस्तानविरुद्ध ३४५ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी ३५.२ षटकांत २१५ धावा मोजल्या. फलंदाजीत मात्र आघाडीची फळी उपयुक्त ठरली. सदिरा समरविक्रम आणि कर्णधार कुसाल मेंडिस यांनी शतके झळकविली, तर पथुम निसांका आणि चरिथ असलंका यांनीही योगदान दिले.
विश्वचषक हेड टू हेड
एकूण सामने ११इंग्लंड विजयी ६श्रीलंका विजयी ५
सामन्याचे स्थळ : एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू
सामन्याची वेळ : दुपारी २ वाजल्यापासून