India Vs England: भारत घेणार का इंग्लंडविरोधात आघाडी?; रहाणे की अश्विन, कुणाला मिळणार संधी

चौथी कसोटी आजपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 08:33 AM2021-09-02T08:33:28+5:302021-09-02T08:33:49+5:30

whatsapp join usJoin us
Will India take the lead against England ?; Rahane or Ashwin, who will get the opportunity pdc | India Vs England: भारत घेणार का इंग्लंडविरोधात आघाडी?; रहाणे की अश्विन, कुणाला मिळणार संधी

India Vs England: भारत घेणार का इंग्लंडविरोधात आघाडी?; रहाणे की अश्विन, कुणाला मिळणार संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन: लीड्सवरील दारुण पराभवानंतर मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या इराद्याने उतरणाऱ्या भारतीय संघापुढे आज गुरुवारपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होत असलेल्या ओव्हलवरील चौथ्या कसोटीत फलंदाजी सुधारण्याचे आव्हान असेल. याशिवाय खराब फॉर्मशी झुंज देत असलेला अजिंक्य रहाणेला कायम ठेवावे की ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन याला संधी द्यावी याबाबत संघ व्यवस्थापन डोके खाजवित आहे. 

लॉर्ड्सवरील प्रेरणास्पद विजयानंतर भारताच्या फलंदाजांनी हेडिंग्लेत दोन्ही डावांत निराश केले होते.  हा सामना उभय संघांसाठी  फारच महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही संघ सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ सध्या १-१ असे बरोबरीत आहेत.

मधल्या फळीची चिंता

कर्णधार विराट कोहलीला सर्वांत मोठी चिंता मधल्या फळीच्या अपयशाची आहे. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे अशा दिग्गजांकडून धावांची अपेक्षा असेल. पुजाराने लीड्सवर दुसऱ्या डावात ९१ धावांची खेळी करीत फाॅर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले होते. 
लॉर्ड्सवर दुसऱ्या डावात ६१ धावा काढणारा रहाणे मात्र त्यानंतर अपयशी ठरला. सूर्यकुमार यादवसारखा आक्रमक फलंदाज आणि हनुमा विहारीसारखा पारंपरिक फलंदाज मधल्या फळीला आकार देऊ शकतो. रहाणेला बाहेर बसविल्यास विहारीला संधी मिळू शकेल; कारण तो ऑफ स्पिन गोलंदाजीही करू शकतो.

अश्विनला मिळू शकते संधी

अश्विन हा जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटू आहे. याउलट जडेजाने तीन सामन्यांत केवळ दोन गडी बाद केले. ओव्हलच्या खेळपट्टीवर पारंपरिकरीत्या फिरकीपटूंना मदत मिळते. त्यामुळेच भूतकाळात इंग्लिश गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या अश्विनला येथे संधी मिळण्याची शक्यता आहे.

कोहलीला अतिरिक्त फलंदाज नकोच !

सुनील गावसकर यांच्यासह अनेक दिग्गजांनी अतिरिक्त फलंदाज खेळविण्याचा सल्ला दिल्यानंतरही कोहली मात्र स्वत:च्या पसंतीचा संघ खेळविण्यावर ठाम आहे. गावसकरांच्या मते अतिरिक्त फलंदाज खेळविल्याने मदत होईल.  दुसरीकडे, सलामीवीर रोहित शर्मा आणि तिसऱ्या कसोटीत खराब कामगिरी करणारा लोकेश राहुल यांच्याशिवाय  अन्य फलंदाजांच्या अपयशानंतरही पाच गोलंदाजांसह उतरण्याचा कोहलीचा विचार कायम आहे.

शार्दूल घेणार ईशांतचे स्थान?

चार वेगवान गोलंदाजांना खेळविण्याचा कोहलीचा विचार दिसतो. तथापि  अपेक्षापूर्तीत अपयशी ठरलेला ईशांत शर्मा याच्याऐवजी अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावू शकणारा शार्दूल ठाकूर याला तो संधी देऊ शकतो. कोहलीने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यावरील भार कमी करण्याचे संकेत दिले आहेत. 

उभय संघ यातून निवडणार

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, लोकेश राहुल, रिद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी साव, सूर्यकुमार यादव, शार्दूल ठाकूर आणि  प्रसिद्ध कृष्णा. राखीव : अर्जन नागवासवाला.

इंग्लंड : जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स ॲन्डरसन, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, रोरी बर्न्स, सॅम कुरेन, हसीब हमीद, डेन लॉरेन्स, डेव्हिड मलान, क्रेग ओव्हरटन, ओली पोप, ओली रॉबिन्सन, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.
 

Web Title: Will India take the lead against England ?; Rahane or Ashwin, who will get the opportunity pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.