एक्स्पर्ट कमेंट: भारत डब्ल्यूटीसी फायनल जिंकणार?

मागील अपयश विसरून भारताला यावेळी फायनल जिंकण्याचे अवघड आव्हान असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 11:22 AM2024-08-25T11:22:07+5:302024-08-25T11:22:34+5:30

whatsapp join usJoin us
Will India win the WTC final | एक्स्पर्ट कमेंट: भारत डब्ल्यूटीसी फायनल जिंकणार?

एक्स्पर्ट कमेंट: भारत डब्ल्यूटीसी फायनल जिंकणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर|

पुढच्या सहा-सात आठवड्यांत भारताला बांगलादेशविरुद्ध दोन आणि न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामने खेळायचे आहेत. हे पाचही सामने विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा (डब्ल्यूटीसी) भाग असल्याने महत्त्वाचे आहेत. दोन्ही मालिकांमधून भारतीय खेळाडू स्वतःचा फॉर्म तपासू शकतील. या आधारे 'थिंक टैंक' भविष्यातील योजना आखणार आहे. दोन्ही मालिका जिंकून अधिकाधिक गुणांची कमाई करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. यामुळे फायनलची दावेदारी निश्चित होऊ शकेल. डब्ल्यूटीसी फायनलसाठी (२०२५) भारताला सर्वांत महत्त्वाचा असेल तो ऑस्ट्रेलिया दौरा ! भारतीय संघ मागच्या दोन्ही फायनलमध्ये क्रमशः न्यूझीलंड २०२१) आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (२०२३) पराभूत झाला. यावेळी भारत- ऑस्ट्रेलिया फायनल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील अपयश विसरून भारताला यावेळी फायनल जिंकण्याचे अवघड आव्हान असेल.

वयाशी तिशी ओलांडलेल्यांवर नजर दोन्ही संघांत अनेक खेळाडू ३० वर्षांहून अधिक वयाचे आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, रविचंदन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी यांचे वय ३० हून अधिक आहे. ते आणखी किती काळ खेळू शकतील या दृष्टीने बीसीसीआय या सर्वांकडे मोठ्या आशेने पाहत आहे.

२००१ नंतर खुन्नस वाढली

ऑस्ट्रेलियात भारताविरुद्ध पाच सामन्यांची मालिका ही फार मोठी बाब ठरते. उभय संघांत कुठल्याही प्रकारातील सामना तसा रोमहर्षक ठरतोच. विश्व क्रिकेटमध्ये भारत- ऑस्ट्रेलियासारखी प्रतिस्पर्धा दुसरी नाहीच. २००१ला कोलकाता येथे ऐतिहासिक विजयानंतर उभय संघांमध्ये खुन्नस वाढली. लढतीदेखील रंगतदार होऊ लागल्या.

चार मालिकांमध्ये भारताचे वर्चस्व

दोन्ही संघांमधील कसोटी सामन्यांचा विचार केल्यास चारही मालिकांमध्ये भारताने वर्चस्व गाजविले. त्यातील दोन मालिका (२०१८ आणि २०२०-२१) भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मैदानावर हरवून जिंकल्या. २०१७ आणि २०२२ ला ऑस्ट्रेलियाने भारताचा दौरा केला तेव्हा दोन्ही वेळा त्यांचे पितळ उघडे पडले होते. त्यामुळे आगामी दौऱ्यात ऑस्ट्रेलिया वचपा काढण्याच्या इराद्याने खेळणार. शिवाय जगातील सर्वोत्कृष्ट कसोटी संघ ठरविणारी ही मालिका असेल.

...तर रोहित सर्वोत्कृष्ट कर्णधार !

भारत-ऑस्ट्रेलिया मालिका डब्ल्यूटीसी फायनलसाठी अधिक मोलाची असेल. भारताने डब्ल्यूटीसीवर नाव कोरल्यास टी-२० विश्वविजेतेपदानंतर कर्णधार रोहितसाठी जेतेपदाचा 'दुहेरी मुकुट' ठरणार आहे, दोन जेतेपद त्याला सर्वोत्कृष्ट कर्णधारांच्या पंक्त्तीत नेऊन बसवेल.

ऑस्ट्रेलियात खेळणे भारतासाठी मोठे आणि अवघड आव्हान आहे. भारताला नमविण्यासाठी ऑस्ट्रेलिया कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो. प्रतिस्पर्धी संघाला कोंडीत पकडू शकतील, अशा खेळपट्ट्या बनविल्या जातील. ऑस्ट्रेलियाने आतापासूनच मालिकेची तयारी सुरू केली आहे.'

- मॅथ्यू हेडन

ऑस्ट्रेलिया संघाला पराभव या शब्दाचा तिरस्कार आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू फारच आक्रमक आहेत. प्रत्येक परिस्थितीत लढण्याची वृत्ती जोपासतात. भारताविरुद्धची आगामी मालिका काही खेळाडूंसाठी तर फारच महत्त्वपूर्ण असेल.'

- रवी शास्त्री

Web Title: Will India win the WTC final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.