भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी करतोय आणि ५ पैकी ५ सामने जिंकून अपराजित राहिलेला हा एकमेव संघ आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघात बदलाचे वारे पाहायला मिळणार आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, आर अश्विन यांचा हा अखेरचा वर्ल्ड कप असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंग जनरेशन टीम इंडियात दिसेल. त्यातच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हाही संघासोबत दिसू शकणार नाही. वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत त्याचा करार आहे.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या ट्वेंटी-२०T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघाचा प्रभारी प्रशिक्षक म्हणून दिसू शकतो. वर्ल्ड कप संपल्यानंतर आठवडाभरातच ही मालिका सुरू होणार आहे. द्रविडचा करार वर्ल्ड कपच्या शेवटी संपणार आहे आणि साहजिकच BCCI कडे भारताच्या माजी कर्णधाराला पुन्हा अर्ज करण्याची विनंती करण्याचा पर्याय आहे, कारण बोर्डाला नियमानुसार या पदासाठी पुन्हा अर्ज मागवावे लागतील.
५१ वर्षीय द्रविडला राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहायचे आहे की नाही, हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. टीम इंडियासोबत सतत प्रवास अन् दडपण त्याला झेलावे लागतेय. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स सारख्या संघांचे प्रशिक्षक असलेला द्रविड पुन्हा आयसीएलमध्य़े परतण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, "राहुलने ब्रेक घेतला तेव्हा व्हीव्हीएस लक्ष्मण नेहमीच प्रभारी प्रशिक्षक असतो आणि वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी तोच दिसू शकतो."
द्रविडने पुन्हा प्रशिक्षकपदासाठी उत्सुकता न दाखवल्यास आणि नवीन अर्ज मागवले गेले तर लक्ष्मण हा एक अतिशय मजबूत उमेदवार असू शकतो. ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी रोहित शर्मा , विराट कोहली , केएल राहुल , जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली जाईल. त्यानंतरच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ताजेतवाने होण्यासाठी त्यांना ब्रेक दिला जाईल. २३ नोव्हेंबरपासून विशाखापट्टणममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.