लंडन - भारत आणि न्यूझीलंडच्या संघामध्ये आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना शुक्रवारपासून खेळला जाणार आहे. दोन्ही संघ या अंतिम लढतीच्या निमित्ताने त्रयस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळणार असल्याने या सामन्यासाठीच्या खेळपट्टीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, साऊथम्पटनमधील खेळपट्टीचे मुख्य क्युरेटर सायमन ली यांनी या अंतिम लढतीसाठी वेगवान आणि उसळी घेणारी खेळपट्टी तयार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच या खेळपट्टीकडून नंतर फिरकीपटूंनाही काही मदत मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ईएसपीएनक्रिकइन्फो या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत ली यांनी सांगितले की, या कसोटीसाठी खेळपट्टी तयार करणे थोडे सोपे आहे. कारण हे तटस्थ ठिकाण आहे. आम्हाला आयसीसीच्या नियमांचे पालन करायचे आहे. मात्र आम्हाला चांगली खेळपट्टी तयार करायची आहे. ज्या खेळपट्टीवर दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत होईल.
वैयक्तिकदृष्या मी अशी खेळपट्टी तयार करू इच्छितो ज्यावर वेग आणि चेंडूला उसळी मिळाली पाहिजे. इंग्लंडमध्ये अशी खेळपट्टी तयार करणे कठीण होऊ शकते. कारण बहुतांश वेळा हवामान साथ देत नाही. मात्र या सामन्यासाठीची भविष्यवाणी चांगली आहे. खेळपट्टीवर खूप उन पडणार आहे. त्यामुळे खेळपट्टीमध्ये गती असेल. तसेच अधिक प्रमाणात रोलर न चालवल्यास ती कडक खेळपट्टी राहील.
अंतिम सामन्यात खेळणाऱ्या दोन्ही संघांकडे उच्च क्षमतेचे वेगवान गोलंदाज आहेत. गती लाल चेंडूद्वारे खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटला रोमांचक बनवते. मी क्रिकेटचा प्रशंसक आहे. मला अशी खेळपट्टी तयार करायची आहे ज्यावर क्रिकेटप्रेमी प्रत्येक चेंडू खेळणे पसंद करेल.
येथील हवामानाबाबत ली म्हणाले की, मी जशी हवामानाची भविष्यवाणी केली आहे तशी येथील खेळपट्टी लवकरच कोरडी पडते. त्यामुळे या खेळपट्टीवर फिरकीलाही मदत होईल.
Web Title: Will it be the pitch for the WTC final, will India benefit, or will New Zealand dominate?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.