मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्याने टीम इंडियाची चिंता वाढलेली आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. त्याचदरम्यान, बुमराहला तंदुरुस्त होण्यासाठी चार ते सहा महिने लागतील. असा अंदाज वर्तवला जात होता. त्यामुळे १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाला त्याला मुकावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र आता जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत मोठ्ठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जसप्रीत बुमराहला कुठल्याही प्रकारचा फ्रॅक्चर नसून, तो ४ ते ६ आठवड्यांमध्ये तंदुरुस्त होईल, असे सांगण्यात येत आहे.
टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघाचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानसोबत होणार आहे. एनसीएमध्ये बीसीसीआयच्या मेडिकल टीमने जसप्रीत बुमराहच्या दुखापतीची तपासणी करण्यात आली. यामध्ये त्याला स्ट्रेस फ्रॅक्चर नसून, स्ट्रेस रिअॅक्शन असल्याचे समोर आले आहे. ही फ्रॅक्चरच्या आधीची पातळी आहे. त्यामुळे त्याला तंदुरुस्त होण्यासाठी ४ ते ६ महिने नाही तर ४ ते ६ आठवडे लागतील. मिळालेल्या माहितीनुसार सर्व काही व्यवस्थित झालं तर जसप्रीत बुमराह वर्ल्डकपच्या नॉकआऊट राऊंडमध्ये खेळताना दिसेल.
भारतीय संघ टी-२० विश्वचषकासाठी ५ ऑक्टोबर रोजी रवाना होणार आहे. मात्र भारतीय संघासोबत जसप्रीत बुमराहचे जाणे थोडे कठीण आहे. संघव्यवस्थापन १५ ऑक्टोबरपर्यंत त्याच्या दुखापतीबाबत पुढील माहिती मिळण्याची वाट पाहिली. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. सूत्रांनी सांगितले की, १५ ऑक्टोबरपर्यंत कुठल्याही तांत्रिक समितीशिवाय खेळाडूंचा संघात समावेश करता येईल. त्यामुळे सर्वजण बुमराहच्या फिटनेस चाचणीच्या रिझल्टची वाट पाहिली जात आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकामध्ये बायो बबलचा अवलंब केला जाणार नाही. त्यामुळे भारतीय संघ नियमित विमानाने ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. स्पर्धेदरम्यान कोविड-१९ची चाचणीही होणार नाही. केवळ तक्रारीनंतरच अशा प्रकारची तपासणी केली जाईल.