Jofra Archer, Mumbai Indians: IPL 2022 साठी नुकतेच Mega Auction पार पडलं. या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिल्या दिवशी फारसे गडी विकत घेतले नाहीत. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी जोर लावला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्यासाठी मुंबईच्या संघाने तब्बल ८ कोटी रूपये मोजले आणि त्याला संघात दाखल करून घेतलं. सध्या दुखापतग्रस्त असल्याने आर्चर यंदाच्या हंगामात खेळू शकणार नाही हे सर्व संघांना माहिती होतं. तरीदेखील भविष्याचा विचार करत मुंबईने जोफ्रा आर्चरसाठी मोठी रक्कम मोजली. परंतु, यावर्षी तो खेळणार नसला तरीही त्याला त्याच्या ८ कोटी रूपयांच्या बोलीपैकी थोडी तरी रक्कम मिळणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला. पाहूया याबद्दल नियम काय सांगतात.
यंदाच्या हंगामासाठी जोफ्रा आर्चर खेळणार नसला तरी पुढच्या वर्षी जसप्रीत बुमराहच्या साथीने तो वेगवान मारा करेल या विचार डोक्यात धरत मुंबईने त्याला ताफ्यात दाखल करून घेतलं. पण, यंदाच्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सकडून जोफ्रा आर्चरला ८ कोटीपैकी थोडी रक्कम दिली जाणार का? याचं उत्तर 'नाही' असं आहे. नियमाप्रमाणे, जर करारबद्ध केलेला खेळाडू हंगाम सुरू होण्याआधी दुखापतग्रस्त असेल आणि स्पर्धा खेळू शकणार नसेल तर त्याला बोलीची रक्कम मिळत नाही. तसेच, जर स्पर्धा सुरू असताना मध्येच एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर त्याला विमा योजनेअंतर्गत त्याची नुकसान भरपाई दिली जाते.
दरम्यान, दुखापतीमुळे २०२२चे आयपीएल सत्र खेळणार नाही, असे सांगूनही मुंबई इंडियन्सने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला आठ कोटी रुपयात संघात घेतले. २०२३ आणि २०२४ चे पर्व लक्षात घेत जोफ्राला लिलावात सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली होती. लिलावानंतर संघाच्या मालकीण नीता अंबानी यांनी यामागील हेतू स्पष्ट केला. मुंबई इंडियन्सचे लक्ष्य नेहमी लघुकालीन असते. मात्र, दूरदृष्टी ठेवूनच आम्ही वाटचाल करतो. आम्ही जे खेळाडू निवडले ते दीर्घकालीन योजना आखूनच निवडले. लिलावात आम्ही सर्वोत्कृष्ट प्रयत्न केले हे चाहत्यांना सांगू इच्छिते. नव्या पर्वाबाबत मी फारच उत्सुक आहे', अशा भावना नीता अंबानी यांनी व्यक्त केल्या.