कोलकाता : विराट कोहली फॉर्ममध्ये परतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला थोडी भाग्याचीही साथ लाभली. त्या बळावर या संघाने नाट्यमयरीत्या आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये धडक दिली. आज बुधवारी हा संघ एलिमिनेटरमध्ये लखनौ सुपर जायंट्सला कडवे आव्हान देण्यास सज्ज आहे.सुरुवातीच्या सामन्यात लवकर बाद झाल्यानंतर कोहलीने गुजरात टायटन्सविरुद्ध अखेरच्या साखळी लढतीत ५४ चेंडूत ७३ धावा केल्या होत्या. या सत्रातील हे त्याचे दुसरे अर्धशतक. आक्रमक शैलीत फटकेबाजीच्या बळावर त्याने आरसीबीच्या आशा पल्लवित ठेवल्या. संघासाठी केवळ विजय पुरेसा नव्हता, तर दुसऱ्या सामन्यात दिल्लीविरुद्ध मुंबईच्या विजयासाठी प्रार्थना करावी लागली.
मुंबईने दिल्लीला नमवून आरसीबीला ‘प्ले ऑफ’चे गिफ्ट दिले. फाफ डुप्लेसिसच्या संयमी नेतृत्वाच्या बळावर हा संघ पहिल्या आयपीएल जेतेपदाकडे एक पाऊल टाकण्याच्या स्थितीत दिसतो. तीन आयपीएल फायनल खेळलेला आणि दिग्गजांचा भरणा असलेला आरसीबी चाहत्यांच्या अपेक्षांची पूर्तता करू शकलेला नाही. तीनदा आयपीएल विजेत्या संघातून खेळलेला डुप्लेसिस यंदा आरसीबीसाठी ‘लकी चार्म’ ठरू शकेल?
सिराजने १३ सामन्यात आठ तर हेजलवूड, हसरंगा आणि हर्षल यांनी मिळून ५७ गडी बाद केले. नव्या खेळपट्टीवर ते कसा मारा करतात हे पाहावे लागेल. पाच कोटी ५० लाखात संघात आलेला ३६ वर्षांचा दिनेश कार्तिक (१४ सामन्यात २८७ धावा) हुकुमी एक्का ठरेल का? हादेखील लाखमोलाचा प्रश्न आहे.आरसीबीच्या फलंदाजांचा सामना लखनौचे युवा वेगवान आवेश खान आणि मोहसिन खान यांच्याशी असेल. लखनौकडे दुष्मंत चामिरा आणि जेसन होल्डरसारखे अनुभवी गोलंदाजदेखील आहेत. सलामीवीर लोकेश राहुल आणि क्विंटन डिकॉक (दोघांच्या मिळून १०३९ धावा) यांच्यावर लवकर दडपण आणले नाही तर आरसीबीची स्थिती कठीण होईल. या जोडीने २१० धावांची आयपीएल इतिहासातील सर्वांत मोठी नाबाद सलामीदेखील केली आहे. मधल्या आणि तळाच्या स्थानावर मात्र संघाकडे चांगले फलंदाज नाहीत. दीपक हुड्डाचा अपवाद वगळता मार्कस स्टोयनिस, कृणाल पांड्या, आयुष बडोनी आणि होल्डर हे अपयशी ठरले.
कोहलीचा फॉर्म, दिनेश कार्तिकचे फिनिशर म्हणून यश, जोश हेजलवूड, वानिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांची गोलंदाजी या गोष्टी ईडनच्या खेळपट्टीवर आरसीबीचा जोश द्विगुणित करतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.