नवी दिल्ली : भारताचा अनुभवी फलंदाज लोकेश राहुल इंग्लंडविरुद्ध धर्मशाला येथे पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासदेखील मुकण्याची शक्यता आहे. कारण, त्याच्या उजव्या जांघेच्या मांसपेशींवरील सूज अद्याप कायम आहे. हैदराबादच्या पहिल्या कसोटीत खेळल्यानंतर राहुल सतत संघातून बाहेर आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, राजकोटमधील तिसऱ्या कसोटीदरम्यान राहुल ९० टक्के फिट होता. तो आपल्या दुखण्यावर तज्ज्ञांचे मत जाणून घेण्यासाठी सध्या लंडनमध्ये गेला आहे. भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली असल्यामुळे ७ मार्चपासून सुरू होत असलेल्या पाचव्या कसोटीसाठी संघ व्यवस्थापन जोखीम उचलू इच्छित नाही.
आयपीएलच्या सूत्रानुसार, राहुल सध्या लंडनमध्ये आहे. फलंदाजी करतेवेळी त्याच्या जांघेत दुखणे उमळते. भारतीय संघाला आणि लखनौ फ्रॅन्चायजीला त्याची गरज असल्याने तो दीर्घकाळ फलंदाजी करू शकतो का, हे पाहावे लागेल. ही जखम मागच्या वर्षी आयपीएलमध्येच झाली होती. त्यामुळे मागच्या वर्षीही तो चार महिने क्रिकेटपासून दूर होता.
सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेसाठी तो भारतीय संघात परतला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अनिर्णीत राहिलेल्या कसोटी मालिकेत राहुलने शतक ठोकले होते. राहुल न खेळल्यास सहा डावांत केवळ ६३ धावा काढणारा रजत पाटीदार संघात कायम असेल. दुसरीकडे, रांची कसोटीत विश्रांती घेणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाचव्या सामन्यात खेळणार आहे. डब्ल्यूटीसी गुणतालिकेच्या दृष्टीने धर्मशाला येथे बुमराहचे खेळणे अनिवार्य ठरते. भारतीय संघ डब्ल्यूटीसीत न्यूझीलंडनंतर दुसऱ्या स्थानी आहे.
राहुल हा आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व करतो. मधल्या फळीचा तो आधारस्तंभही आहे. जूनमध्ये वेस्ट इंडीज आणि अमेरिकेच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान पक्के करण्याच्या हेतूने राहुल आयपीएलमध्ये चुणूक दाखविण्यास प्रयत्नशील आहे.
संघात दोन बदल?रांची कसोटीत बुमराहच्या जागी आकाश दीपने पदार्पण केले. आकाश दीपने पदार्पणाच्या सामन्यातच ३ बळी घेतले. या मालिकेत बुमराहची कामगिरीही उत्कृष्ट राहिली आहे. त्याने ३ सामन्यांत १३.६५ च्या सरासरीने १७ गडी बाद केले. पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माही अंतिम संघात दोन बदल करू शकतो. रांची कसोटीत खेळलेल्या संघातील एक फलंदाज आणि एका गोलंदाजाला रोहित विश्रांती देऊ शकतो. यानुसार यशस्वी जैस्वालला विश्रांती दिली जाऊ शकते. एखाद्याला डावलण्याचा विचार झाला तर रजत पाटीदार बाहेर जाऊ शकतो.