Join us  

महेंद्रसिंग धोनी IPL 2024 खेळणार की नाही? कॅप्टन कूलने दुखापतीबाबत दिले मोठे अपडेट्स

इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लिलाव होणार असल्याचे वृत्त येतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 4:10 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लिलाव होणार असल्याचे वृत्त येतेय. तो लिलाव दुबईत होण्याची शक्यता अधिक आहे आणि बीसीसीआयने फ्रँचायझींना त्यांच्या रिटेन व रिलीज ( कायम ठेवलेल्या व करारमुक्त केलेल्या) खेळाडूंची यादी १५ नोव्हेंबरपर्यंत सोपवण्यास सांगितली आहे. अशात महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) IPL 2024 मध्ये खेळण्याबाबत अपडेट्स समोर आले आहेत. आयपीएलच्या मागील पर्वात धोनी निवृत्ती घेईल अशी चर्चा रंगली होती आणि चेन्नई सुपर किंग्सने ( CSK) जेतेपदाची ट्रॉफीही उचलली. त्यानंतर धोनीला निवृत्तीबाबत विचारले गेले, तेव्हा त्याने IPL 2024 ला बराच काळ शिल्लक असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

मग धोनी आयपीएलचे आणखी एक पर्व खेळेल का? महेंद्रसिंग धोनीच्या गुडघ्याची दुखापत त्याला दोन महिन्यांची आयपीएल खेळण्याची परवानगी देईल का? तो चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलचे सहावे जेतेपद जिंकून देईल का? असे अनेक प्रश्न सध्या चाहत्यांच्या मनात घर करून बसले आहेत. आयपीएल २०२४ हे सात महिने दूर आहे आणि पुन्हा एकदा धोनीच्या निर्णयावर लक्ष लागले आहे. याबाबत डिसेंबरमध्ये निर्णय घेईन असे धोनीने सांगितले आहे.  

धोनीने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना संभ्रमात ठेवले आहे. ४१ वर्षीय धोनी सध्या क्रिकेटपासून विश्रांती एन्जॉय करतोय. आयपीएलनंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. एका कार्यक्रमात त्याची पत्नी साक्षी हिनेही माही दुखापतीतून सावरत असल्याचे सांगितले होते.    

महेंद्रसिंग धोनीला विश्वचषक-2023 मध्ये भारतीय संघाच्या विजयासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना धोनी म्हणाला, "भावना समजून घ्या, हा चांगला संघ आहे, संघाचा समतोलही उत्तम आहे, सर्वजण चांगले खेळत आहेत, यापेक्षा मी अधिक काहीही बोलणार नाही, समजणाऱ्यांना इशारा पुरेसा आहे."

 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२३