कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील भांडणाला आता वेगळीच कलाटणी मिळण्याची चिन्हे आहेत. हसीनने शामीची तक्रार पोलिसांकडे तर केलीच आहे, पण आता तिने दार ठोठावले आहे ते थेट ' दीदीं'चे म्हणजेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे. राजकारणातील बरीच कोडी सोडवणाऱ्या ममता दीदी आता शामी आणि हसीन यांच्यातील भांडण सोडवणार का? याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल. एका महिला मुख्यमंत्र्यांनी सामान्य महिलेची मदत करावी, अशी मागणी हसीनने केली आहे.
हसीनने शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. हसीनने शामीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचाही आरोप केला आहे.
पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यावर हसीनने बुधवारी ममता यांच्याकडून मदत मागितली आहे. हसीनने हे सारे प्रकरण ' दीदीं 'ना सांगितले आहे. त्याचबरोबर या प्रकरणात मुख्यमंत्री या नात्याने आपण हस्तक्षेप करावा, अशी विनंतीही हसीनने दीदीं 'ना केली आहे. शामीवर आरोप केल्यावर मला धमक्या मिळत आहेत, त्यामुळे मला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी हसीनने दीदीं 'ना केली आहे.
हसीनचे वकिल जाकिर हुसेन यांनी याबाबत सांगितले की, " हसीनला आता काही धमक्या येत आहेत, त्यामुळे तिला असुरक्षित वाटत आहे. हसीन लाल बाजार येथील कोलकाता पोलीस मुख्यालयामध्ये गेली होती आणि तिने आपल्याला संरक्षण देण्याची मागणी केली आहे. हसीनला मुख्यंमत्र्यांकडून समर्थन हवे आहे. त्यामुळे हसीनने आपल्या मागण्या ममताजींना पाठवल्या आहेत. त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा हसीनला आहे. "