अबुधाबी : सलग तीन सामने गमावलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सची बाद फेरी गाठण्याची वाटचाल अडचणीत आली आहे. मंगळवारी मुंबईकरांना सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव असलेल्या पंजाब किंग्सविरुद्ध भिडायचे आहे. या सामन्यात बाजी मारून संघाची गाडी विजयी मार्गावर आणण्याचा प्रयत्न मुंबईकर करतील.
यूएईमध्ये आयपीएलचे उर्वरित सामने सुरू झाल्यापासून मुंबईकरांची कामगिरी खालावली आहे. यामुळे त्यांची चौथ्या स्थानावरून सातव्या स्थानी घसरण झाली आहे. मात्र, पिछाडीवर पडल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करण्यात तरबेज असलेला मुंबई संघ काहीही करू शकतो, याची पूर्ण जाणीव असल्याने पंजाब संघालाही पूर्ण ताकदीने जोर लावावा लागेल.मुंबईसाठी चिंतेची बाब आहे ती मधल्या फळीचे अपयश. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांचे अपयश महागडे ठरत आहे.
कर्णधार रोहित शर्माने सलग दोन सामन्यांत चांगली सुरुवात केली, मात्र त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. पहिल्या दोन सामन्यांत संघाबाहेर राहिलेल्या हार्दिक पांड्यालाही गेल्या सामन्यात छाप पाडता आली नाही. विशेष म्हणजे सूर्या आणि हार्दिक यांचा टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश असून, दोघांची कामगिरी चिंताजनक ठरली आहे. गोलंदाजीत मात्र मुंबईकडून अपेक्षित कामगिरी झाली आहे. हातातील सामना मोक्याच्या वेळी गमावण्याची कामगिरी अनेकदा झाल्याने पंजाबला सामन्यावर मिळवलेली पकड अखेरपर्यंत घट्ट ठेवावी लागेल.