मुंबई : पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा मंगळवारी घरच्या स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना होईल. पहिले तीन सामने गमावल्यानंतर मुंबईकरांनी चौथ्या सामन्यात आरसीबीला नमविले. या वेळी मुंबईकर लयीत आले असे दिसत असतानाच, रविवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध पुन्हा एकदा हातातील सामना मुंबईने गमावला. आतापर्यंत मुंबईने ५ सामने खेळताना केवळ एकच विजय मिळविला आहे. त्याउलट हैदराबादने ५ पैकी ३ सामने जिंकताना चांगली कामगिरी केली आहे.वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना यजमानांना सर्वोत्तम खेळ करावा लागेल. राजस्थानविरुद्ध १७व्या षटकापर्यंत सामन्यावर पकड मिळविलेल्या मुंबईच्या डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट गोलंदाजांनी निर्णायक क्षणीच सुमार मारा केला. अशा परिस्थितीत हैदराबादविरुद्ध गोलंदाजांना आपली कामगिरी सुधारावी लागेल. विशेष म्हणजे, डावाच्या सुरुवातीला मुंबईकर गोलंदाज धावा रोखण्यात यशस्वी ठरत असले, तरी डेथ ओव्हर्समध्ये होत असलेला सुमार मारा मुंबई इंडियन्सला महागात पडत आहे. यावर निश्चितच यजमानांना अधिक काम करावे लागेल.फलंदाजांमध्ये सूर्यकुमारने मुंबईसाठी सातत्यपूर्ण कामगिरी केली असून, त्याने जवळपास सर्वच सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे. कर्णधार रोहित शर्माची आरसीबीविरुद्ध केलेल्या ९४ धावांच्या खेळीचा अपवाद वगळता, त्याला अद्याप आपल्या लौकिकानुसार छाप पाडता आली नाही. त्याचबरोबर, किएरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या या अष्टपैलू त्रिकुटालाही अद्याप म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान, आता मुंबईचे ९ सामने शिल्लक राहिले असून, अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळविण्यासठी मुंबईकारांना किमान ७ सामने जिंकावे लागतील.दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादने सलग तीन सामने जिंकत यंदाच्या सत्राची धडाक्यात सुरुवात केली, परंतु किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपरकिंग्जविरुद्धच्या सलग पराभवामुळे त्यांना गुणतालिकेत अव्वल स्थान गमवावे लागले. त्यामुळेच पुन्हा विजयी मार्गावर परतण्यासाठी ते मुंबईला नमविण्यास सज्ज असतील. कर्णधार केन विलियम्सन जबरदस्त फॉर्ममध्ये असून, त्याने ५ सामन्यांत २३० धावा कुटल्या आहेत, तसेच शिखर धवन, रिद्धिमान साहा यांच्यासह इतर फलंदाजांकडून अद्याप त्याला अपेक्षित साथ मिळालेली नाही. त्याच वेळी ‘स्विंगचा बादशाह’ भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वात हैदराबादच्या गोलंदाजांनी समाधानकारक कामगिरी केली आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- मुंबई इंडियन्स आज तरी जिंकणार का?
मुंबई इंडियन्स आज तरी जिंकणार का?
आज सनरायझर्स हैदराबादचे कडवे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:01 AM