गोंडा (उ.प्रदेश) : भारतीय क्रिकेटला नामवंत अष्टपैलू अगदी बोटावर मोजण्याइतके लाभले आहेत. टीम इंडियात स्थान मिळविणारा व्यंकटेश अय्यर हा युवा खेळाडू स्वत:ची उपयुक्तता टिकविण्यासाठी फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीकडेही लक्ष देऊ इच्छितो.
आयपीएलमधील कामगिरीच्या बळावर २६ वर्षांच्या व्यंकटेशला संघात स्थान देण्यात आले. बीसीसीआयने त्याला संघात घेऊन कामाची विभागणी करण्याची योजना डोळ्यापुढे ठेवली असावी. आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणारा व्यंकटेश म्हणाला, ‘आतापर्यंतच्या कामाची विभागणी चांगलीच झाली. मी अष्टपैलू असल्याने मला फलंदाजीसह गोलंदाजीवर सारखे लक्ष द्यावे लागेल. वयोगटातील स्पर्धांमध्ये मध्य प्रदेशकडून खेळताना असे केल्यामुळे माझ्यासाठी हे मोठे आव्हान नाही.’
खेळातील तिन्ही प्रकारात कौशल्य दाखविण्याची इच्छा व्यक्त करीत तो म्हणाला, ‘मी कोणत्याही प्रकारात कामगिरी करू इच्छितो. त्यासाठी फलंदाजीसह गोलंदाजीही सक्षम करावी लागेल.’ अय्यरने केकेआरकडून ३७० धावा केल्या, तीन गडी बाद केले. त्याच्याकडे हार्दिकचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. रणजी करंडकात मध्य प्रदेशसाठी सात अर्धशतकी खेळी आणि सात गडी बाद करणारा व्यंकटेश म्हणाला, ‘माझ्या प्रवासात केवळ आयपीएलचीच भूमिका नाही. मध्य प्रदेशकडून रणजी, विजय हजारे करंडक आणि मुश्ताक अली करंडक सामने खेळून ही मजल गाठली आहे. चांगल्या कामगिरीच्या बळावर राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकतो, असा मनात विश्वास होता.’
सीए ते क्रिकेट
इंदूरमध्ये वास्तव्य करणाऱ्या अय्यरमधील प्रतिभा स्थानिक प्रशिक्षक दिनेश शर्मा यांनी ओळखली. एमबीए उत्तीर्ण असलेल्या अय्यरला बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीची ऑफर होती, पण वडिलांच्या प्रोत्साहनामुळे त्याने क्रिकेटला प्राधान्य दिले. व्यंकटेश हा चार्टर्ड अकाऊंटन्सीमधील फाऊंडशेन आणि इंटर अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.