मुंबई : आपल्या 360 डिग्री फटकेबाजीनं प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना चक्रावून टाकणाऱ्या एबी डिव्हिलियर्सला वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना कोणाला पाहायला आवडणार नाही? दक्षिण आफ्रिकेच्या या स्फोटक फलंदाजाने गतवर्षी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तीन वन डे वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करताना डिव्हिलियर्सने आपला दबदबा दाखवून दिला. 2007च्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध 146 धावांची विक्रमी खेळी केली होती, तर 2011मध्ये त्यने विंडीजविरुद्धच 66 चेंडूंत 162 धावा चोपल्या होत्या.
त्यामुळे इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याची बॅट पुन्हा तळपताना पाहायला मिळावी, अशी अनेकांची इच्छा आहे. पण तो वर्ल्ड कप खेळणार नाही, परंतु 2023च्या वर्ल्ड कपमध्ये त्याचे पुनरागमन होऊ शकते. ‘Breakfast with Champions’ या मालिकेत त्याने चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी दिली. 2023चा वर्ल्ड कप तू खेळणार का, या प्रश्नावर डिव्हिलियर्स हसला आणि गमतीदार उत्तर दिले. तो म्हणाला,''2023पर्यंत मी किती वर्षांचा होईन? 39! मी पुनरागमन करेन, जर महेंद्रसिंग धोनीही खेळत असेल तर. मी तंदुरुस्त असल्यास, ते शक्य आहे. मला 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळायला आवडले असते, परंतु मी आता निवृत्ती स्वीकारली आहे. त्यामुळे हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे.''
''गेल्या तीन वर्षांत मी संघातून आत-बाहेर होत राहीलो. त्यामुळे माझ्यावर भरपूर टीका झाली. मी निवृत्ती घेण्यामागे हे एक कारण आहे. असो, पण मी आताही वर्ल्ड कप खेळू शकतो,'' असे त्यानं सांगितलं. त्यानं पुढं हेही सांगितलं की,''संघाला मी नेहमी प्राधान्य दिले आहे. निवृत्ती घेण्यामागे अनेक कारणं आहेत, पण मला ती सांगायची नाहीत. कुटुंबाला देऊ न शकणारा वेळ आणि गेल्या 15 वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळून वाढलेला ताण, हेही निवृत्तीमागचं कारण आहेच.''